मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सवात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाची ‘सुवर्ण’मय कामगिरी

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या विभागात द्वितीय वर्षात शिकणारी श्रुती पवार हिला मुंबई विद्यापीठाच्या सुरू असलेल्या ५७ व्या युवा महोत्सवात एकांकिका (मराठी गट) प्रकारात अभिनयासाठी सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५७ व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात उत्साहात गेल्या महिन्यात उत्साहात झाली होती. यात संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता.
दि. २८ ऑगस्टपासून या महोत्सवाच्या अंतिम फेरीला विद्यापीठात सुरुवात झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत ती चालणार आहे. यात एकांकिका (मराठी) प्रकारात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या ९ कलाकारांच्या चमूची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत या चमूने चमकदार कामगिरी केली. यात श्रुती पवार हिने उत्कृष्ट अभिनयाचे दर्शन घडवत सुवर्ण पदक पटकावले. श्रुतीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



