मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

प्रलंबित प्रस्तावांबाबत गतीने पाठपुरावा करावा – पालक सचिव सीमा व्यास

100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक सर्वांचा सहभाग चांगला

रत्नागिरी : 100 दिवस कृती आराखडा शासनाच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग चांगला दिसून येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामांबाबत चांगले काम करा. शासनाकडे असणाऱ्या प्रलंबित प्रस्तावांबाबत गतीने पाठपुरावा करावा, असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव (साप्रवि) सीमा व्यास यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती व्यास यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती व्यास म्हणाल्या, शासनाच्या या कार्यक्रमात सर्वांनी चांगला सहभाग घेतला आहे. तुम्ही सर्वजण सक्षम आहात. चांगले काम कराल. जलजीवन मिशन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याबाबत जे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असतील त्याबाबत गतीने पाठपुरावा करावा. नवीन कामे सुरु करण्यापूर्वी जुन्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करुन प्राधान्याने ती पूर्ण करावीत. याबाबतचा अहवाल आठवड्याभरता द्यावा. काळजीपुर्वक लक्ष द्यावे. त्याचबरोबर प्रलंबित असणाऱ्या कामांबाबतची कारणे द्यावीत. शासनाकडे पाठविताना परिपूर्ण प्रस्ताव असावा. क्षेत्रिय स्तरावर येणाऱ्या कामांबाबतच्या अडचणी माझ्याशी चर्चा करुन कळवाव्यात. काही सुधारणा असतील त्याबाबतही चर्चा करावी, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वप्रथम सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबाबत तसेच पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी जलजीवन मिशनबाबत संगणकीय सादरीकरण केले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले. बैठकीनंतर श्रीमती व्यास यांनी लांजा तहसील कार्यालयाला भेट देऊन तेथील पाहणी केली. त्यानंतर आसगे येथे भेट देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी मधील बांधलेला गोठा, शेततळे तसेच जलजीवन मिशनमधील जलकुंभ आदी कामांची पाहणी केली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी डाॕ जॕस्मिन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले, सरपंच अनुष्का गुरव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button