मुख्य बातमीशैक्षणिक

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि आदर्श भंडारी मंडळ (पुणे) यांच्या वतीने पाठ्यपुस्तक मंडळ संचालकांना निवेदन

रत्नागिरी : रत्नागिरीतील पतितपावन मंदिराबाबत चुकीचा इतिहास आठवीच्या पाठ्यपुस्तकात छापण्यात आला होता. हा चुकीचा इतिहास बदलला; मात्र त्यात पतितपवन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले, असा उल्लेख करावा, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती (पुणे) आणि पाठ्यपुस्तक मंडळ संचालकांना देण्यात आले.

रत्नागिरीतील पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधले असा चुकीचा इतिहास इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात छापण्यात आला होता. याबाबत रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने आवाज उठवला होता. याबाबत २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात आले होते. तसेच पालकमंत्र्यांशीही चर्चा केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे याची दखल घेऊन हा धडा पाठ्यपुस्तकात बदलण्यात आला होता.

यासंदर्भात इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या प्र. विशेष अधिकारी सौ. वर्षा सरोदे यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, “इयत्ता आठवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास छापण्यात आला होता. त्यामध्ये आम्ही सुचविलेली दुरुस्ती आपण केल्याचे आपण आपल्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ च्या पत्राद्वारे कळविले आहात. परंतु आम्ही ही दुरुस्ती सुचविलेली नसून जो इतिहास पतितपवन मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे, तोच इतिहास व त्याच शिलालेखामधील वाक्य आपण आठवीच्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात अधीप्रमाणित करावे. आपण त्यामध्ये कोणताही नवीन शब्द घालू नये अथवा त्यातील कोणताही शब्द वगळू नये ही नम्र विनंती.

शिलालेख : देशवीर विनायकराव सावरकर यांचे विंनंती वरुन भक्तीभूषण श्रीयुत भागुजी बाळुजी कीर ह्यांनी हें श्री पतित पावनाचे मंदिर अखिल हिंदू प्रित्यर्थ स्वकीय व्ययाने श्री भागेश्वर कृपेने बांधून लोक सेवेस अर्पण केले आहे,” असे या निवेदनात म्हटले आहे.

इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक मंडळाच्या प्र. विशेष अधिकारी सौ. वर्षा सरोदे यांना हे निवेदन देतेवेळी रत्नागिरी भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, पुणे येथील आदर्श भंडारी मंडळाचे अध्यक्ष शाम वेंगुर्लेकर, आदर्श भंडारी मंडळाचे दत्तात्रय हिंदळेकर, ईश्वरदास घारे, नंदकुमार कवठणकर, रमेश मयेकर, विठ्ठल कांबळी, स्मिता कीर, श्रीमती वेंगुर्लेकर, श्री. मळेकर, कौस्तुभ नागवेकर, रोहित शिवलकर, सिद्धेश सुर्वे, राहुल शिवलकर, ओम कीर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button