विकास साखळकर जीवनभूषण पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय आणी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रक्तदान क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या विकास साखळकर यांना बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या १८ वर्षांत ४९ वेळा रक्तदान करताना विकास साखळकर यांनी ३७ वेळा तातडीची आवश्यकता असताना रक्तदान केले आहे. या ३७ पैकी २९ वेळा गर्भवती मातांना रक्तदान केले आहे.
समाजातील मूठभर लोकांच्या चांगुलपणावर समाजाचा रहाटगाडा ओढला जातो, या मूठभर लोकांच्या चांगुलपणाला काहीजण समाजकार्य म्हणतील तर काहीजण रिकामटेकडेपणा; मात्र रत्नागिरीचे सुपुत्र विकास साखळकर यांच्याकडे पाहिल्यानंतर दातृत्व म्हणजे काय हा प्रश्न सहज सुटतो. एक सर्वसामान्य चालक म्हणून काम करणारे आणि रक्तदान करणे हाच छंद मानून गेल्या विकास साखळकर यांच्या कामाची कुणी दखल घेतली नाही तरच नवल.
कोविड काळात तर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत दोन रक्तदान शिबिरे घेतली. पहिल्या शिबिरात त्यांनी आपल्या चालक बांधवांमार्फत जिल्हा शासकीय रक्तपेढीला ४० रक्तबॅग उपलब्ध करून दिल्या. तर दुसऱ्या वेळी घेतलेल्या शिबिरात त्यांनी आपल्या मित्रपरिवारांमार्फत २३ रक्तबॅग उपलब्ध करून दिल्या. स्वतः सोबतच त्यांनी अनेक लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले आहे.
रक्तदान हाच छंद मानून काम करणाऱ्या विकास साखळकर यांना यापूर्वी जीवनदान ग्रुप रत्नागिरी यांच्याकडून आदर्श रक्तदाता, क्रांतीसुर्य सामाजिक संघटना बारामती यांच्याकडून समाज भूषण पुरस्कार, जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्याकडून विक्रमी रक्तदाता, सीबीएस मराठी न्यूज सांगोला यांच्याकडून समाजरत्न पुरस्कार तर हिरकणी महिला विकास संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांना मिळालेल्या या जीवनभूषण पुरस्कारामुळे सर्व स्तराकडून त्यांचं कौतुक होत आहे.



