महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

कोकणकर यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर शिमगा करणार

कोकणकर यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर शिमगा करणार

पनवेल : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर कोकणकरांच्यावतीने शिमगा करण्यात येणार आहे. यामध्ये पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत एकाच वेळेत महामार्गांवर प्रतिकात्मक होळी लावण्यात येईल, तर माणगाव बायपास व संगमेश्वर येथे सरकारच्या डेडलाईनची सार्वजनिक होळी करण्यात येईल, असा इशारा जनआक्रोश समितीकडून देण्यात आलेला आहे.

जनआक्रोश समितीच्या वतीने माणगाव येथे २३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन महामार्गाची परिस्थिती कोकणकरांच्या समोर मांडण्यात आली. मुंबई-गोवा महामार्ग संदर्भात जनआक्रोश समितीच्यावतीने पळस्पे ते पोलादपूर महामार्गाची पाहणी करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी शासनाने केलेल्या चुकांचा पाढा सामान्य जनतेकडून वाचण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिलेल्या नवीन डेडलाईन नुसार हा महामार्ग गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले; परंतु जनआक्रोश समितीने केलेल्या पाहणी नुसार ही देखील दिलेली एक डेडलाईन आहे.

शासनाच्या वतीने सांगण्यात येत असलेला पळस्पे ते कासू हा पहिला टप्पा ९८ टक्के पूर्ण झाला असून इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे; परंतु या केलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या कामावर पुन्हा खड्डे पडलेले दिसत आहेत. मार्गावर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईन, डिव्हायडरमध्ये वृक्षारोपण, साईडपट्टी या गोष्टींचा अद्यापही अभाव दिसून येत आहे. तसेच यानंतर दुसऱ्या टप्प्यात आमटेमपासून इंदापूरपर्यंत बरेचसे काम बाकी आहे. यामध्ये आमटेम ब्रिज, नागोठणे ब्रिज, रातवड ब्रिज, कोलाड ब्रिज, लोणेरे ब्रिज, इंदापूर व माणगाव बायपास यांचे काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबत शंका आहे.

माणगावमधील ट्रॅफिक समस्या अगदी भयंकर आहे. यावर वेळोवेळी शासनाकडे मागणी करून देखील यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. तसेच स्थानिकांकडून सुचविण्यात येणाऱ्या पर्यायी मार्गाचा विचार देखील करण्यात येत नाही. माणगावमधून दिघीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना ठराविक वेळेत माणगाव शहरात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या सर्व बाबींची शासन दखल घेत नसल्याने कोकणकरांच्यावतीने महामार्गांवर शिमगा करण्यात येणार आहे. यामध्ये पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत एकाच वेळेत महामार्गांवर प्रतिकात्मक होळी लावण्यात येईल, तर माणगाव बायपास व संगमेश्वर येथे सरकारच्या डेडलाईनची सार्वजनिक होळी करण्यात येईल, असा इशारा जनआक्रोश समितीकडून देण्यात आलेला आहे.

या पत्रकार परिषदेला जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव, उपाध्यक्ष सुरेंद्र पवार, सचिव रूपेश दर्गे, नियोजन प्रमुख जितेंद्र गिजे, संघटन प्रमुख विकास निकम, सहखजिनदार प्रशिल लाड, समाजसेवक अण्णा साबळे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष रणपिसे, जिल्हा प्रभारी संज्योग मानकर, माणगाव सचिव कु. रमेश ढेबे, ऍड. अजिंक्य मोरे, अमित उतेकर व पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button