महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी 

सिंधुदुर्ग : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवसाला पावणारी भराडी देवी अशी या देवीची ख्याती आहे. यावेळी नऊ रांगांमध्ये भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत. वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने भाविकांचा महापूर आंगणेवाडीत उसळणार आहे. नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासनाने यात्रेची पूर्ण सज्जता केली आहे. आंगणेवाडी आणि परिसर भाविकांनी गजबजुन गेला आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या आजपासून होणाऱ्या यात्रेसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यात्रेच्या नियोजनावर लक्ष देऊन आहेत. त्यांनी यात्रास्थळाची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. आज पहाटे ३ वाजल्यापासून दर्शन आणि ओटी भरणे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी एकूण ९ रांगांची व्यवस्था करण्यात आलीआहे. यात्रेसाठी मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी मोठ्या संख्येनं भेट देतात त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनची नजर संपूर्ण यात्रेवर राहणारआहे. सहा पोलीस उपाधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ३२ सहाय्य्क पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक, १५० होमगार्ड आणि घातपात नियंत्रण पथक नेमण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाने देखील जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. रविवारी २३ फेब्रुवारीला मोड यात्रेने या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button