स्वप्न मिरकरवाडा पूर्ततेचे

– अभिजीत हेगशेट्ये
मिरकरवाडा मच्छिमार बंदर हे खऱ्या अर्थाने रत्नागिरीच्या आर्थिक आणि सामुद्रिक विकासाचे प्रवेशद्वार आहे. मागील तीन ते चार दशके या विकासाच्या प्रवेशद्वरालाच सिल्टेशनच्या व्हायरसने कोंडून ठेवले आणि बंदराचा विकास मनमोकळा आणि नियोजितपणे होऊच शकला नाही. याच्या कारणांची कारणे अनेक आहेत. त्यावर प्रदीर्घ चर्चा आणि परिसंवादाचे आखाडे रंगत राहतील; मात्र नव्या सरकारच्या नव्या प्रतिनिधींकडून काही वेगळे घडण्याचे संकेत रत्नागिरीच्या मागील चार दशकांचा इतिहास बदलणारी आणि मत्स्य-बंदर क्रांतीचे पर्व आणणारी असू शकेल, असा आशावाद जागवू लागला आहे.
भाट्ये – मिरकरवाडा मच्छिमार बंदर ते भगवती बंदर आणि पुढे मिऱ्या ते काळबादेवी हा समुद्र किनारा हे रत्नागिरी शहर आणि परिसराला लाभलेले अद्भूत नैसर्गिक लेणं आहे. रत्नागिरीच्या जागतिक पातळीवरील सर्वांगीण श्रेष्ठतेचे आणि विकासाचे मर्म या निसर्गदत्त किनाऱ्यात दडलेले आहे. याची पहिली जाणीव आणि दूरदृष्टी रत्नागिरीचे मशहूर उद्योजक एम. डी. नाईक आणि त्यांचे मार्गदर्शक डॅा. रानडे यांना होती. त्यातूनच मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ना. शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून भगवती जेट्टी, मिरकरवाडा मासेमारी बंदर याचा मूलभूत पाया रचला गेला. खन्ना नावाच्या ज्येष्ठ ठेकेदाराने हे काम केले; मात्र समुद्राचे अंतरंग आणि प्रवाह याच्या मोजमापात काही गफलत झाली आणि पुढील दोन तीन दशके मिरकरवाडा बंदर गाळात, सिल्टेशनमध्ये रुतत राहिले. येथील गाळ काढण्याचे कोट्यवधींचे काम काढणे आणि त्यातील मलिदा लाटत बसणे, हेच पुढील काळातील शासन प्रशासनातील मुख्य काम राहिले. पुनः पुन्हा तिच सरंक्षण भिंत बांधायची, गाळ काढायचा तेथेच टाकायचा पुन्हा पुढील वर्षी त्याच कामासाठी कोट्यवधींचा वाढीव निधी… काहींच्या कोट्यवधींच्या उत्पन्नाचे ते साधनच झाले.
कोट्यवधींची मासेमारी आणि त्यावर आधारित हजारो कुटुंबे असे मिरकरवाडा बंदर म्हणजे रत्नागिरीची आर्थिक धमणी आहे. मासेमारी उत्तम असेल, तर रत्नागिरी शहर बाजारपेठ तेजीत असते… तरीही या बंदराची मूलभूत समस्या दूर करण्यासाठी प्राधान्य मिळाले नाही. या अंधाधुंद कारभारभारात मच्छिमार आपले आपले मार्ग शोधत राहिला. बंदरावर लाईट सुविधा नाही, पिण्याचे पाणी नाही, टॅायलेट सुविधा नाही, शीतगृह, बर्फ पुरवठा, डिझेल पुरवठा, मासे उरण्यासाठी अद्यावत यंत्रणा काही म्हणजे काहीच सुविधा नाही. यातून मासेमारी व्यवसाय मागणीमुळे बरकतीत आहे. त्यासाठी येथील मच्छिमार आपली आपली सुविधा पाहत बंदरावर एक एक टपरी उभारत राहिले. शहरातील नाक्या नाक्यावर होणाऱ्या टपऱ्यांपेक्षा यांची संख्या वाढत गेली आणि एक प्रंचड अनधिकृत साम्राज्य उभे राहिले… त्यांचे दादा तयार झाले. सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणसाला धंदा करणे कठीण होऊ लागले. मासेमारी व्यवसाय करण्यात रत्नागिरी बंदरात महिलांचा सहभाग फार मोठा आहे. त्यातही मुस्लिम समाजातील महिला १६-१६ तास काम करत हा व्यवसाय करतात. त्यातून या शहराला आणि देशाला फार मोठे परदेशी चलन आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उद्योगाची संधी आहे.
गेली ३-४ दशके हा मच्छीमार अत्यंत विपन्न अवस्थेत आपला व्यवसाय विस्तारत आहे. आज नवे तंत्रज्ञान आणि सोबत नवी पिढी या व्यवसायात आली आहे. यातून होणाऱ्या मागण्यावर मलमपट्टी होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर होतात काही रस्ते, मार्केट यार्ड; परंतु यात योग्य नियोजनाचा अभाव आहे. कारण अनधिकृत झोपड्यांच्या विळख्याने बंदर ग्रासले आहे आणि ते तोडण्याची हिंमत कोणात नाही. यापूर्वी फरोग मुकादम या तहसीलदार जांबाज महिलेने ती हिंमत दाखवत बंदर परिसर मोकळा केला होता; मात्र पुन्हा पुढच्याच वर्षी परिस्थिती जैसे थे झाली आणि एकही मोकळ्या जागा न सोडता बंदरावर अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट झाला. मिरकरवाडा प्राधिकरण स्थापना होऊन आराखडाही तयार झाला; मात्र असणाऱ्या या अतिक्रमणाला हात कोण लावणार, हा प्रश्न होता. या बंदरात १ हजार मच्छीमार बोटी आहेत. त्यापैकी कोठे नोंद, आवक-जावक यंत्रणा काहीच नाही. त्या बोटींकडून पैसेही नाही. यातून एक अज्ञात यंत्रणा येथे कार्यरत झाली होती. त्या माध्यमातून महिन्याला दीड ते दोन कोटींचा मलिदा हाती येत असल्याच्या चर्चा आता अधिक जोरात होतात.
ना. नितेश राणे यांना मस्त्य बंदरविकास मंत्रीपदाची जबाबदारी मिळताच त्यांनी पहिला हातोडा चालविला तो रत्नागिरीच्या प्रवेद्वारावर, फारच अचूक निशाणा साधला आहे. त्यांनी ज्या प्रश्नाला सतत टाळले जात होते. तोच प्रश्न त्यांनी प्राधान्याने उचलला आहे. मिरकरवाडा अतिक्रमण अत्यंत निर्भय आणि कोणाचाही मुलाहीजा न ठेवता हटवणे हे फार जोखमीचे आणि धाडसाचे होते. त्यांनी ते अगदी पूर्ण ताकदीने अंमलात आणत त्यांच्या नव्या इनिंगला रत्नागिरीच्या प्रवेशद्वारावरच मोकळे मैदान उभारले. यांत अनेकांचे नुकसान झाले. काही संसार उघड्यावर आले; मात्र ते होणे ही रत्नागिरीच्या कोंडलेल्या श्वास मोकळा होण्याची गरज होती.
मिरकरवाडा बंदराचे स्वप्न अनेक दशके अनके राजकीय सत्तांनी रंगविले आहे. रत्नागिरीच्या मत्स्य उद्योगाची ती शान आहे आणि पर्यटन उद्योगाचा तो आधार आहे. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार आणि उद्योगाची संधी देण्याची क्षमता असणारे हे निसर्गतः अप्रतिम बंदर आहे. या बंदराचा मूलभूत विकासाचा आराखडा ना. राणे यांनी तयार केला आहे आणि तो कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय राबविण्याचा संकल्प आणि ॲक्शन प्लॅन जाहीर केला आहे. हे फारच महत्त्वाचे पाऊल आहे. जवळपास १० हजार कोटींची वार्षिक आर्थिक उलाढाल करणारे मिरकरवाडा मच्छीमार बंदर एक जागतिक दर्जाचे अद्ययावत मच्छिमार बंदर होऊ शकते. आज एआय आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या काळात त्याची गरज आहे. ज्या उद्योगावर रत्नागिरीतील हजारो महिला आणि युवक आपला रोजगार सांभाळतात ते बंदर मुलभूत पातळीवर सुधारणे तेथे अद्यावत सुविधा देणे हा संकल्प आणि प्रकल्प हाती घेत ना. नितेश राणे यांनी फार मोठी झेप घेतली आहे. विविध २२ प्रकारच्या सुविधांतून बंदर विकासाचा हा संकल्प साकारणार आहे. या माध्यमातून भावी उद्यमशील रत्नागिरीचे ते शिल्पकार बनू शकतात!


