मुख्य बातमी

आयुष्य टवटवीत ठेवायचे असेल तर योग आवश्यक 

जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांचे प्रतिपादन 

रत्नागिरी : भारतीय परंपरेतील एक अमूल्यशास्त्र म्हणून योगशास्त्राकडे पाहिले जाते. योगामुळे केवळ शरीरच नव्हे तर मनाची देखील शुद्धी होते त्यामुळे धकाधकीच्या काळात आयुष्य जर टवटवीत ठेवायचे असेल तर योग आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी केले. ते योग प्रमाणपत्र कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ. पां वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात खास रत्नागिरीकरांसाठी संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने नि:शुल्क योग प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचा समारोप दि. २८ ऑगस्ट २०२४ झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि बी ए आणि एम ए योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या योग प्रात्यक्षिकाने झाली.

आपल्या मनोगतात जिल्हा नियोजन अधिकारी म्हणाले की, योग शिकलात तरी त्यात सातत्य ठेवा शिवाय तुमच्याकडील योग ज्ञान दुसऱ्यांना देऊ करा जेणेकरून तुमच्यासोबतच इतरांचा ज्ञान संचय वाढेल.

यावेळी बँक ऑफ इंडियाचे (रत्नागिरी जिल्हा) क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र देवरे यांनी उपस्थितांना सुदृढ आरोग्याचा मंत्र देताना निरोगी जीवन साधायचे असेल तर निरंतर योग करणे हाच एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन केले.

या योग कार्यशाळेत एकूण ४८ रत्नागिरी करांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यशाळेचे संपूर्ण संचालन योग प्रशिक्षक प्रा अक्षय माळी यांनी केले होते. यावेळी उपस्थितांना प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी सत्याविनायक मुळे आणि बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र देवरे यांचेवर संस्कृत श्लोक रचना केली आणि त्यांचे स्वागत केले. यावेळी उपकेंद्रातील प्रा अविनाश चव्हाण, स्वरूप काणे, अपर्णा कोकरे, निकिता अडखराव, करण कीर, प्रथमेश घोसाळे, कौशल जोशी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कश्मिरा दळी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button