मुख्य बातमी

वाहतुकीचे नियम स्वत:पासून पाळले पाहिजेत

अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड : एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

रत्नागिरी : “आपल्याला नियम तोडल्याचा अभिमान वाटतो त्यामुळे ही मानसिकता बदलली तरच अपघात कमी होतील”, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रद्येश बोरसे, वाहतूक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) वाहन निरीक्षक उदय साळुंखे, जयंत गुरव आदी उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, “रस्ते सुरक्षा बाबतीत आपण नियम पाळतो का, सुरक्षेचे नियम जसे की दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे, दारू न पिता वाहन चालवणे, सील्ट बेल्ट न लावता चारचाकी चालवणे, आदींची सुरवात स्वत:पासून करायला पाहिजे. आपल्याला नियम तोडल्याचा अभिमान न वाटता वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अपघातानंतर जीवीतहानी झाली तर त्या संपूर्ण कुटुंबांची हानी होते. आपल्याकडे हेल्मेटसक्तीविरोधात आंदोलने होतात ही मानसिकता बदलली पाहिजे. त्यामुळे स्वत:पासून नियम पाळले पाहिजेत, जेणेकरून अशा अभियानाची गरज भासणार नाही.”

कार्यक्रमाची प्रस्तावना शहर वाहतूक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी वाहतूक नियमांबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीबाबत माहिती देताना ही मोहिम केवळ सप्ताहापुरती नसून वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर नवनिर्माण शिक्षण संस्थेत वाहतुकीविषयक घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. निबंध स्पर्धा (महाविद्यालय गट) : प्रथम क्रमांक- वैष्णवी दोडके, द्वितीय क्रमांक- स्नेहा जाधव, तृतीय क्रमांक- सारा तज्जुदीन मुकादम. शालेय गट : प्रथम क्रमांक- दुर्वांका कडवेकर, द्वितीय क्रमांक- अनाया ठाकूर, नाझीस अलजी. ज्युनियर कॉलेज : प्रथम क्रमांक- प्रथमा थापा, द्वितीय क्रमांक- असिफा होडेकर, तृतीय क्रमांक- नायाब नेवरेकर. पोस्टर स्पर्धा (महाविद्यालयीन गट) प्रथम क्रमांक- युसरा काझी, यश मयेकर, अफ्रा वाडकर. ज्युनियर कॉलेज : प्रथम क्रमांक- इन्शा धामणस्कर, द्वितीय क्रमांक- सलोनी सागवेकर, तृतीय क्रमांक- नायबा नेवरेकर. शालेय गट : प्रथम क्रमांक- अरफा डिंगणकर, द्वितीय क्रमांक- खेमराज गुप्ता, तृतीय क्रमांक- दिलशा बेंद्रे.

याबरोबरच वाहतुकीबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करणारी टीम आणि प्रशिक्षक प्रा. सुशील साळवी, प्रा. निकिता नलावडे व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गाडी चालवताना अपघात न करता सेवा केल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button