मुख्य बातमी

लोकअदालतीमध्ये ५५६ प्रकरणे निकाली

विधी सेवा प्राधिकरण ; ५ कोटी ३१ लाख ८१ हजारांची तडजोड

रत्नागिरी : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच झाली. या लोकअदालतीमध्ये ५५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, ५ कोटी ३१ लाख ८१ हजार ८५६ रुपयांची तडजोड झाली.

न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित राहिल्यामुळे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याबरोबरच न्याययंत्रणेवरसुद्धा ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. त्यामुळे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालत झाली.

लोकअदालतीचे उद्‍घाटन रत्नागिरी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव माणिकराव सातव व इतर सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ उपस्थित होते. वादपूर्व प्रकरणांपैकी १५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात बीएसएनएल, विविध बॅंका, महावितरण कंपनी, पतसंस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांची थकबाकी, अदखलपात्र गुन्हे, वाहतूक विभाग यांनी वाहनांवर केलेली दंडात्मक कारवाई, त्यांच्या वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातून १ कोटी २६ लाख ६० हजार ६९५ रुपयांचे तडजोड शुल्क जमा झाले.

ही अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी तसेच सचिव माणिकराव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील सर्व तालुका विधीसेवा समिती व त्यांचे कर्मचारी, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button