दापोलीचे साहित्यिक प्रा. बाळासाहेब लबडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : दापोलीचे साहित्यिक प्रा. बाळासाहेब लबडे यांना त्यांच्या ‘काळ मेकर लाइव्ह’ या कादंबरीस पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंती दिनी (नारळी पोर्णिमा) १९ ऑगस्ट डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबेयांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, “प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार, डॉ. समीर चव्हाण यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, प्रफुल्ल शिलेदार यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार, डॉ. श्रीनिवास हेमाडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार, बाळासाहेब लबडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार आणि प्राजक्त देशमुख यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार, हसन शेख पाटेवाडीकर यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
एकात्मिक ग्रामीण विकासाचे आद्य प्रवर्तक, सहकारी साखर कारखानदारीचे जनक व सहकारी चळवळीचे अध्वर्यू पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कार प्रदान समारंभात ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रुपये एक लाख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये ५१ हजार व स्मृतिचिन्ह डॉ. समीर चव्हाण (कानपूर) यांच्या ‘अखई ते जाले’ (तुकाराम:हिंदुस्तानी परिवेशात – खंड १ व २) संशोधन ग्रंथास, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) प्रफुल्ल शिलेदार (नागपूर) यांच्या ‘हरवलेल्या वस्तूंचे मिथक’ या कविता संग्रहास, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार (रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) डॉ. श्रीनिवास हेमाडे (संगमनेर) यांच्या ‘तत्वभान’ या ग्रंथास व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार (रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) बाळासाहेब लबडे (नेवासा) यांच्या ‘काळ मेकर लाइव्ह’ या कादंबरीस दिला जाणार आहे. याबरोबरच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) नाशिक येथील प्राजक्त देशमुख यांना आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) कर्जत येथील तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली.
साहित्य पुरस्कार देण्याचे हे ३४ वे वर्ष असून, अध्यक्ष ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरचे रवींद्र शोभणे यांच्या हस्ते महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी यावेळी सांगितले.
समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे (अध्यक्ष), डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पाहिले.
प्रा. बाळासाहेब लबडे यांची ‘काळ मेकर लाइव्ह’ ही महत्त्वाची कादंबरी आहे. वर्तमानकाळी समाज माध्यमांच्या द्वारे माहितीचा महापूर आल्यानंतर जे जीवनाचे भेसूर आणि अराजकीय वास्तव निर्माण झाले आहे त्याचे नव्या तंत्रशैलीत चित्रण करणारी ही कादंबरी आहे. या लेखकांमध्ये उद्याच्या उत्तम वाड:मय निर्मितीच्या बीजखुणा दिसून येतात. याचा विचार करून त्यांनाही पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.



