राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा कलाश्री पुरस्कार अभिनेता सचिन काळे यांना जाहीर

रत्नागिरी : कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल येथील प्रसिद्ध अभिनेते सचिन काळे यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेतर्फे नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाटक, चित्रपट, लोकनाट्य आदींमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे सचिन काळे हे यांनी ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या सुप्रसिद्ध लोकनाट्यातील ‘शिवराम’ हे लक्षवेधी पात्र लोकप्रिय केले आहे. याचे त्यांनी सुमारे साडेचारशे प्रयोग केले आहेत. कोकणातील विविध व्यक्तिरेखांचा बारकाईने अभ्यास करून त्यांची देहबोली, शब्दफेक आत्मसात करून साकारलेली ही भूमिका लोकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याशिवाय लावण्यसखी, निर्वासित आदी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांमध्ये, तसेच हॅशटॅग प्रेम, श्रीदेवी प्रसन्न, घरत गणपती, संगीत मनापमान, एप्रिल मे 99, श्यामची आई हे चित्रपट, एक गाव भुताचा, फु बाई फू हे दूरदर्शन कार्यक्रम, अक्रीत झो, स्वामी हो, अवधूत चिंतन आदी वेबसिरीजमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. संगमेश्वरी बोलीभाषेतून अनेक कविता तसेच कथांचे लेखन केले आहे. तसेच नुकत्याच त्यांच्या कथेला राज्यस्तरीय पारितोषिकही प्राप्त झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आयरे कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान लांजा तालुक्यातील वाटूळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या दरम्यान हा पुरस्कार श्री. काळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.



