जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरची ‘सुवर्ण’मय कामगिरी

रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत एसआरके तायक्वांदो क्लबच्या स्वरा विकास साखळकरने तीन वेगवेगळ्या प्रकरांत ‘सुवर्ण’मय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे झाली. जिल्हाभरातून सुमारे ७०० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. यात एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू आणि सुवर्णकन्या स्वरा साखळकरने या स्पर्धेत विशेष ठसा उमटविला.

क्युरोगी प्रकारात ३७ किलो आतील वजनी गटात तिने सुवर्णपदक मिळवले, तर १४८ सेमी या उंचीच्या गटातही तीने ही घोडदौड चालू ठेवून दुसरे सुवर्णपदक जिंकले. कॅडेट गटामध्ये झालेल्या फ्री स्टाईल पुमसे प्रकारातही स्वराने केलेल्या पुमसेने पंच, प्रशिक्षक, पालकवर्ग आणि खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेतील पुमसेचा सर्वोच्च 5.7.8 या गुणांची नोंद करत स्पर्धेतील वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
स्वराने केलेल्या या कामगिरीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत, मिलिंद भागवत, क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आणि पालकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले. स्वराही ही इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, ती दामले शाळेची विद्यार्थिनी आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



