मुख्य बातमी

चिपळूणमध्ये सायकल फेरीतून प्रदूषणमुक्तीचा संदेश

चिपळूण : माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहर प्रदूषणमुक्त होण्यासाठी पालिकेने नववर्षाच्या सुरवातीलाच विधायक उपक्रमास सुरूवात केली. दर महिन्याच्या १ तारखेला पालिकेचे अधिकारी व कर्मचारी सायकलने तसेच पायी चालत पालिकेत येणार आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी ९.४५ वाजता पालिकेचे अधिकारी, कर्मचारी सायकलने तसेच पायी चालत पालिकेत आले. या उपक्रमात पालिका कर्मचाऱ्यासह शहरातील नागरिकही सहभागी झाले. सहभागींनी शहरात सायकल चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला. या निमित्ताने नियमित सायकल चालवणाऱ्या व पायी चालणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत चिपळूण पालिकेने शहर प्रदूषणमुक्तीचा संकल्प केला आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी दर महिन्याच्या १ तारखेला सायकलने कार्यालयात येणार आहेत. ज्यांना चालणे शक्य नाही ते पायी चालत येणार आहेत. बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या उपक्रमास सुरूवात करण्यात आली.

पालिकेचे आरोग्य निरीक्षक सुजीत जाधव यांनी माझी वसुंधरा अभियानाची माहिती दिली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले, शहरात वाहनांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यावर सर्वांच्या सहकार्यातून मात करावी लागेल. यामध्ये नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे. ज्यांना सायकल चालवणे शक्य नाही त्यांनी पायी चालल्यास आरोग्यास फलदायी ठरणार आहे. प्रदूषणमुक्तीसाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे; मात्र त्यासाठी नागरिकांची मोलाची साथ आणि सक्रिय सहभागदेखील मोलाचा ठरणार आहे. या अभियानात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

शहरात जे नियमित सायकल चालवतात अशांपैकी कैसर देसाई, प्रभाकर सुर्वे, अहमदअली शेख यांचा सन्मान करण्यात आला. नेहमी पायी चालणाऱ्यांपैकी विकास गांगण, आभिजित पिसे, आदिती थत्ते यांचा गौरव करण्यात आला.

१०० सायकलस्वार, ७० पायी चालणाऱ्यांचा सहभाग

पालिका ते नाथ पै चौक, रंगगोबा साबळे मार्ग, खेडेकर क्रीडा संकूल ते पालिका कार्यालय दरम्यान सहभागी सुमारे १०० लोकांनी सायकल चालवली. पायी चालण्याच्या उपक्रमात ६० ते ७० लोक सहभागी झाले होते. या उपक्रमात पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य, महिला, नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button