एका निष्ठावंताचा, समाजसेवकाचा, विनयशील नेतृत्वाचा प्रवास अनंतात विलीन…

काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती श्री. सुहास उर्फ कुमार वामन शेट्ये या राजकीय नेतृत्वाने जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या स्मृतींनी डोळ्यातून आसवे घरंगळली…
खरे तर कुमार शेट्ये यांना २०१२ पासून मी ओळखू लागलो ते विरोधी पक्षाचे नेते म्हणूनच… परंतु २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि त्यांच्या सोबत काम करण्याचा योग जुळून आला. प्रकृती बरी नसतानाही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणून माझ्या सोबत नव्या उमेदीने उभे राहिले. अनेक प्रचार मोहिमांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. मित्रत्वाचा एक अनोखा पैलू मला जवळून पहावयास मिळाला.
पत्नीचे निधन होऊनही ते कणखरपणे माझ्यापाठी उभे राहिले. अत्यंत साधी राहणी आणि विनयशीलता व पक्षनिष्ठा या त्रिवेणी संगमाने भारलेले हे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले ते एक प्रचंड पोकळी निर्माण करूनच. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अशा या निष्ठावंत नेतृत्वाला ह्रदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली…
– विनायक भाऊराव राऊत



