मुख्य बातमी

गणपतीपुळे येथे २८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मिनी सरस व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन २८ डिसेंबर रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनामाध्ये जिल्ह्यातील एकूण ७५ बचत गट सहभागी होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारींनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. यामध्ये बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, विविध प्रकारचे घरगुती मसाले, पिठे, पापड, लोणची, कोकम, आगळ, कोकणी मेवा, विविध फळांची सरबते, रस, कोकणी खाद्यपदार्थ, मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. नाताळच्या सुट्टीमध्ये प्रदर्शन असल्याने मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी श्री. पुजार यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार.

प्रदर्शन काळात संध्याकाळी स्वयंसहाय्यता समुहातील सदस्य यांचे मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामुहिक कार्यक्रम, सहभागी स्टॉल प्रतिनिधींसाठी फनी गेम आयोजित करण्यात येणार आहेत.

सहभागी स्वयंसहायता समुहातील उत्कृष्ट काम केलेले बँक शाखाधिकारी यांचा गौरव, उत्कृष्ट कामकाज केलेल्या महिलांचा गौरव, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त प्रभागसंघाचा गौरव, नवीन उत्पादनाचे अनावरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा सांगता समारंभ १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहाय्यता समुहाचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री. पुजार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button