महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पहिला क्रमांकावर ठेवणार : उदय सामंत

रत्नागिरी : शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्यावर उद्योग मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ती यशस्वीपणे सांभाळताना मागील अडीच वर्षात उद्योग क्षेत्राशी निगडीत घेतलेले निर्णय, राबवलेली धोरणे याची अंमलबजावणी करत गेल्या अडीच वर्षात उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वनवर आणण्यात आपल्याला यश आले. यापुढेही पाच वर्षांत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात पहिला क्रमांक राहील असा आपला प्रयत्न राहणार आहे. निवडणुकीत राज्यातील जनतेला उद्योगासंदर्भात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची अंमलबजावणी या पुढील काळात करून, आता प्रत्यक्षात उद्योग उभारणी करून रोजगार निर्मिती करण्याला प्राधान्य राहणार असल्याचे नवनिर्वाचित उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्योगमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने ना. सामंत यांचे पाली येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील सरकारमध्ये अडीच वर्ष आपण उद्योग मंत्री म्हणून उत्तम काम केले, त्याची पोचपावती म्हणजेच पुन्हा उद्योग खाते मिळणे हीच आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीमध्ये देशात प्रथम क्रमांक आणण्यात आपल्याला यश आले होते. उद्योगासंदर्भातील बदललेल्या धोरणांचा उद्योजकांना चांगला फायदा झाला असल्याचे ना. सामंत म्हणाले.
गडचिरोलीपासून रत्नागिरीच्या टोकापर्यंत आपण नव्या उद्योगांना मंजुरी मिळवून देण्यात यशस्वी झालो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ३० हजार कोटींचा डिफेन्स व सेमीकंडक्टर हे प्रकल्प आपण आणले. आता प्रत्यक्षात त्याची उभारणी करून त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल, यासाठी प्राधान्य क्रमाने काम केले जाईल. त्याचबरोबर टाटा स्किल सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात उद्योग भवन उभारून त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम सुरू आहे. डावोसमध्ये झालेल्या करारानुसार आता गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याचे ना . सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानंतर प्रथमच मराठी भाषा मंत्रालय आपल्याला देण्यात आले आहे. मराठी भाषेला खूप मोठे महत्त्व आहे. भाषेचा दर्जा अधिक भक्कम करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविले जातील. त्या संदर्भातील एक वर्षाचा आराखडा तयार केला जाणार आहे. जनतेचा विश्वास संपादन करणारा विकास या पुढील काळात आपल्याकडून केला जाईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातूनही त्या खात्याअंतर्गत काम करता येते. साहित्य, नाट्य क्षेत्राशी या विभागाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे साहित्यिकांशी संवाद साधून आवश्यक ते बदल, उपायोजना जनजागृती करून जास्तीत जास्त व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर कसा होईल याकडे आपण प्राधान्याने लक्ष देण्यतात येणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
जिंदल कंपनीतून झालेल्या वायू गळतीमुळे ८९ जणांना बाधा झाली होती. त्यामध्ये १८ मुले, ६९ मुली, १ महिला, १ पुरुषाचा समावेश होता. घटना घडलेल्या दुसर्या दिवशी आपण रत्नागिरी येऊन आढावा घेतला होता. आता पुन्हा एकदा आपण जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली आहे. अपर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यामुळे यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तर बाधित लोकांना नुकसान भरपाई देण्याची सूचना आपण कंपनीला केली आहे. तर पंचक्रोशीत कार्डियाक रुग्णवाहिकेसह अन्य तीन रुग्णवाहिका देण्याच्या सूचना आपण कंपनी प्रशासनाला केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मिर्या एमआयडीसीचा मुद्दा विरोधकांनी पुढे आणला होता. स्थानिकांना एमआयडीसी नको आहे, तर ती होणार नाही. हा निर्णय आपण त्याच वेळी घेतला होता. त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे मिर्या एमआयडीसी हा विषय पूर्णत: संपलेला आहे. बारसू प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांना तत्कालीन उमेदवार व विद्यमान राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी जो शब्द दिला आहे. तो शब्द १०० टक्के पाळला जाईल. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी येथे छोटे छोटे उद्योग येणे आवश्यक आहे. त्यातून रोजगार निर्मिती करून मुंबईला तरुणांचा जाणारा लोंढा आपल्याला थांबवायचा आहे. यासाठी राजापूर, लांजा, मंडणगड, रत्नागिरी येथे छोट्या एमआयडीसी या पुढील काळात निर्माण केल्या जातील. रत्नागिरी तालुक्यात मेर्वी, निवेंडी येथे जागेची पाहणी सुरू आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊनच एमआयडीसी बाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा निर्णय जवळजवळ झाला आहे. काही अपवादात्मक जिल्हे शिल्लक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आपल्यासह ना. योगेश कदम यांना मंत्रीपद मिळाले आहेत. पालकमंत्री म्हणून ना. योगेश कदम यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. त्यामुळे ना. उदय सामंतच पालकमंत्री होणार हे निश्चित झाले आहे.



