जिल्हयात २७ मे ते १० जूनपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी या मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुक काढली जाण्याची शक्यता असून, या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २७ मे ते १० जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा १९७३चे कलम १४४ नुसार मनाई आदेश लागू करण्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुद्ध टीका-टिप्पणी करणे, सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारित करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे, आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होऊन त्यातून तणाव निर्माण शकतो आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र न बाळगणे व बरोबर घेवून न फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ (१) नुसार कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही श्री. सूर्यवंशी यांनी दिला आहे.



