मुख्य बातमीशैक्षणिक

अहिल्याबाई होळकरांची जयंती घराघरांत साजरी करावी

यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या मंत्रिमंडळातील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अमृत गोरे यांचे आवाहन

रत्नागिरी : “पुण्यश्लोक अहिल्याबाईंना प्रजेसाठी कल्याणकारी कामे करण्याची आवड होती. आताच्या राजकारण्यांनी त्यांचा थोडा तरी अभ्यास करून त्यांचे हे गुण अंगी बाणले पाहिजेत. प्रजेसाठी झटणाऱ्या अशा नेतृत्त्वाची दखल घेऊन त्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरांत साजरी करावी,” असे आवाहन यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) मंत्रिमंडळातील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अमृत गोरे यांनी केले.
‘यिन’तर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रत्नागिरीतील नवनिर्माण महाविद्यालयाचा विद्यार्थी अमृत गोरे याची राज्यस्तरीय ‘यिन’ शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी निवड झाली होती. त्याच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत या हेतूने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ‘यिन’ची स्थापना झाली आहे. ‘यिन’तर्फे दरवर्षी निवडणूक घेतली जाते. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांना राज्यस्तरीय ‘यिन’ कॅबिनेटमध्ये मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळते. ही संधी नवनिर्माण महाविद्यालयाचा विद्यार्थी अमृत गोरे याला मिळाली. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे, याच पार्श्वभूमीवर अमृत गोरे यांनी हे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, “अहिल्याबाई होळकर यांचे कार्य जातीपातीच्या पलीकडचे होते. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी भारतात शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या, म्हणूनच आज आपले देव सुरक्षित आहेत. अहिल्याबाई या योग्य न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले; तसेच प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्याबाईंना प्रजेसाठी कल्याणकारी कामे करण्याची आवड होती. आताच्या राजकारण्यांनी त्यांचा थोडा तरी अभ्यास करून त्यांचे हे गुण अंगी बाणले पाहिजेत. प्रजेसाठी झटणाऱ्या अशा नेतृत्त्वाची दखल घेऊन त्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून अहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरांत साजरी करायला हवी.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button