मुख्य बातमी

जिंदाल कंपनीतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी

जन आंदोलन छेडण्याचाही इशारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या वायुगळती प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी तसेच तेथील मानवी जीवितास धोकादायक ठरत असलेल्या सर्व प्रकारच्या कामकाजावर बंदी आणावी. या दुर्घटनेतील दाखल झालेल्या एफआयआरनुसार या बाबत दोषी असलेल्या जिंदाल कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच बाधित व्यक्तींना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करतानाच अन्यथा या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यासंदर्भात आज (२० डिसेंबर) जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी ते स्वीकारले.

या निवेदनात म्हटले आहे की, १२ डिसेंबर रोजी जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या वायुगळतीमुळे शालेय विद्यार्थी तसेच परिसरातील असंख्य नागरिकांना त्रास होवून त्यांच्या जीवितास गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी व ग्रामपंचायतीने यापूर्वी वारंवार केलेल्या सगळ्या तक्रारींकडे शासनाच्या संबंधित विभागांसह कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रसंग ओढवला आहे. आता या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याबाबत तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा भोपाळ वायू गळतीसारखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या भागात होणाऱ्या गंभीर रस्ते अपघाताला सुद्धा जिंदाल कंपनीतून चालणारी ओव्हर लोड वाहतूक कारणीभूत आहे.

या दुर्घटनेतील दाखल झालेल्या एफआयआरनुसार या बाबत दोषी असलेल्या जिंदाल कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी व बाधित व्यक्तींना नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पूनसकर, शहर संघटक प्रसाद सावंत, माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button