जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेली १७ मुले पुन्हा रुग्णालयात दाखल
जयगड वायु गळती प्रकरण

रत्नागिरी : जिंदल पोर्ट कंपनीच्या परिसरात असलेल्या वायू गळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील ७० विद्यार्थी बाधित झाले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली होती; परंतु त्यापैकी १७ विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे काल (१६ डिसेंबर) पुन्हा रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मुलांना पोटदुखी, श्वसनाचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आहे. मुलांना कोणताही धोका नाही, परंतु त्यांच्या लक्षणाप्रमाणे त्यांच्यावर काटेकोर उपचार सुरू आहेत, अशी माहिती परकार हॉस्पिटलचे मुख्य डॉ. अमित पंडोले यांनी दिली.

जिंदल पोर्टच्या गॅस टॅंकर पार्किंग प्लांटमध्ये गॅस गळतीचा हा प्रकार घडला होता. एलपीजी गॅस गळती झाली तर त्याला वास येण्यासाठी त्यामध्ये इथाईल मरकॅप्टर हा वायू मिसळला जातो. या प्लॅंटवर वायू मिसळताना त्याची गळती होऊन जवळपास असलेल्या जयगड माध्यमिक विद्यामंदिरमधील सुमारे ७० मुलांना त्याची बाधा झाली. अनेक मुलांना डोळे चुरचुरणे, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास सुरू झाला. या घटनेने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. कंपनीच्या ऊर्जा केअर सेंटरमध्ये अपेक्षित खाटा, डॉक्टर उपलब्ध नसल्याने मुलांना जयगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. काहींना त्रास न झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. बाधितांपैकी ७० मुलांना खासगी वाहनांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ५८ मुलांना घरी सोडण्यात आले. तर १७ मुले उपचार घेत आहेत.

दरम्यान उपचार घेऊन गेलेल्या मुलांपैकी दोन दिवसात सुमारे १७ मुले पुन्हा परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहेत. या मुलांना पुन्हा श्वसनाचा, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पालकांनी त्यांना दाखल केले आहे. यामुलांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे रिपोर्ट निल आहेत, परंतु त्यांना होणाऱ्या त्रासाप्रमाणे त्यांच्यावर उपचार सुरू आहे, असे डॉ. पंडोले यांनी सांगितले.

जिंदल कंपनी देखील या मुलांवर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा नको, चांगल्या पद्धतीने उपचार होऊ देत, असे कंपनीने हॉस्पिटलला सांगितले आहे. हॉस्पिटलमध्येही मुलांवर चांगले उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.



