“नवनिर्माण”च्या इंद्रधनु क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षा संस्था संचलित निर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रधनु वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आज (१६ डिसेंबर) थाटात उद्घाटन करण्यात आले. १६ ते १९ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ, बॅडमिंटन, रस्सीखेच, बास्केटबॉल आदी खेळ खेळवले जाणार आहेत.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एस. एम. जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करत ढोल-ताशांच्या गजरात एस. एम. जोशी विद्यानिकेतनच्या प्रवेशद्वारापासून मैदानापर्यंत संचालन करण्यात आले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते, हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी, कनिष्ठ महाविद्यालयाची जीएस सलोनी राजीवले, वरिष्ठ महाविद्यालयाचा नवनिर्वाचित जीएस अमान बारगीर, प्रा. सचिन टेकाळे सचिन टेकाळे, प्रा. सचिन गिजबिले, प्रा. दीपाली तावडे, प्रा. डॉ. पूजा मोहिते, प्रा. प्रकाश पालांडे, नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चेअरमन श्री. हेगशेट्ये म्हणाले, विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक कौशल्यांबरोबरच क्रीडा कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने इंद्रधनु क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. संस्थेने क्रीडा क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले असून, गेल्या काही वर्षात महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर चमकले आहेत. केवळ साधनांभावी विद्यार्थी मागे राहू नये या उद्देशाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पहिल्या इनडोअर बास्केटबॉल कोर्ट नवनिर्माण शिक्षण संस्थेने उभारले आहे. यात बास्केटबॉल बरोबरच मॅट खो-खो, मॅट कबड्डी, बॅडमिंटन यांसारखे खेळही यात खेळता येऊ शकतात. या महोत्सवात खेळल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांचा आनंद खिलाडू वृत्तीने घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

तत्पूर्वी प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसएससी कार्यक्रमाधिकारी प्रा. साळवी यांनी केले.






