मुख्य बातमी

राजापूर नगरपालिकेने लाईट बिल न भरल्याने शहरातील बत्ती गूल

महावितरणचे १५ लाखांचे विद्युत बिल थकवले : नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर विद्युत पुरवठा सुरळीत

राजापूर : गेले अनेक तास राजापूर शहरामध्ये विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून नगरपालिकेने गेले कित्येक वर्षांचे प्रलंबित असणारे विद्युत बिल न भरल्याने नाहक राजापूर जनतेला हा त्रास सोसावा लागत आहे. शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राजापूर शहरातील खंडित विजेचा प्रश्न नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांना फोनद्वारे कळविण्यात आला. आमदार सामंत हे सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई येथे असल्याने त्यांनी जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाला फोन लावून तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा, असे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर महावितरणाचे अधिकारी कामाले लागले असून राजापूर शहरात पुन्हा एकदा रोषणाई पाहायला मिळाली.

मात्र आता राजापूर जनतेला नेमका प्रश्न पडायला की माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांत केले तरी काय? मिळालेल्या माहितीनुसार राजापूर शहरातील गेल्या अनेक वर्षांचे महावितरणचे १५ लाखांचे विद्युत बिल अजूनही प्रलंबित आहे. त्याबाबत महावितरणकडून नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून विद्युत बिल भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र हम करे सो कायदा… असे असणारे काही लोकप्रतिनिधींनी या विद्युत बिलाकडे दुर्लक्ष करत जनतेला नाहक वेठीशी धरण्याचे काम करत असल्याने राजापूर येथील नागरिकांनी नगरपालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती दिवस आम्ही अंधाराचा सामना करायचा, पालिकेचे सर्व कर आम्ही वेळेत पूर्ण भरत आहोत; मात्र तरी सुद्धा नगरपालिकेच्या अंदाधुंदी कारभारामुळे जनतेला वेठीस धरण्याचे काम केल्याने आता नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू उमटला आहे.

आमदार किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न फोनद्वारे त्यांच्या कानावर घातला; मात्र त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ यंत्रणा हलवत येथील महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत जनतेला त्रास होईल असे कोणतेही काम करू नका. थकीत असलेल्या बिलाबाबत मी आल्यानंतर तात्काळ मार्ग काढू, असे ही आमदार किरण सामंत यांनी सांगितले. त्यानुसार तात्काळ शहरातील खंडित केलेली विद्युत पुरवठा सुरळीत करा असे आदेश दिले आणि त्यानंतर शहरातील विजेची अडचण दूर झाली. शहरातील समस्त नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button