मुख्य बातमीशैक्षणिक

वाचनाने कल्पनाशक्ती बहरते : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात "साने गुरुजी जीवन कार्य" विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : हल्ली मुलांचे गुण विचारत नाहीत, तर त्यांची कल्पनाशक्ती बघितली जाते. वाचनाने कल्पनाशक्ती बहरते. त्यामुळे आपण दिवसातून किमान १० पाने तरी वाचली पाहिजेत, असे विद्यार्थ्यांनी स्वतःशीच ठरवले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मांडले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यमाने वांड्मय मंडळाच्या वतीने “साने गुरुजी जीवन कार्य” या विषयावर ७ डिसेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार गीते, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, वांड्मय मंडळ प्रमुख प्रा. सचिन गिजबिले उपस्थित होते.

साने गुरुजी यांचे स्वभाव गुण अधोरेखित करताना श्री. कुलकर्णी म्हणाले, साने गुरुजींचे हस्ताक्षर सुंदर होते. आज आपण मोबाईलमुळे लिहायला विसरलो आहोत. टायपिंग किंवा व्हॉइस टायपिंगचा वापर करत असल्यामुळे आपल्या हस्ताक्षरावर त्याचा परिणाम होत आहे. साने गुरुजी यांचे वाचन अफाट होते मात्र हल्ली वाचन कमी झाले आहे. हल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु वाचन हे कल्पनाशक्तीचे माहेरघरे वाचनामुळेच कल्पनाशक्ती बहरतो आज वाचन केले तरच उद्या आपण स्पर्धेत टिकणार आहोत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

साने गुरुजींचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. त्यांची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील. ते उत्तम स्वयंपाकी होते, प्रेमळ हृदयी होते. केवळ ५० वर्षांच्या आयुष्य किती पद्धतीने जगू शकतो याचा विचार साने गुरुजींना जाणून घेतल्यानंतर समजते, असेही श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले. साने गुरुजी यांचे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे मानवतेचे विचार त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिले. मोह टाळणे म्हणजे धर्म असे सांगून जीवनमूल्य संस्कार त्यांनी आपल्या विचार मंथनातून सांगितले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून “युग निर्माता हम बच्चे कल की आशा हम बच्चे, चलते है हम शान से, झुकते नही है मुडते नही है आंधी या तुफान से…” या काव्यपंक्ती विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतल्या.

यानंतर प्राचार्य डॉ. आशा जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सचिन गिजबिले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निकिता नलावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button