उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची तोफ रत्नागिरीत २८ एप्रिलला धडाडणार

रत्नागिरी : शिवसेना आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार असून, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात २८ एप्रिल रोजी त्यांची तोफ धडाडणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा याच मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असून, यावेळी हॅटट्रिक साधण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचारयंत्रणा राबविली आहे. या मतदारसंघातून त्यांची उमेदवारी आधीच निश्चित झाल्याने त्यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. गेल्या दोन महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत खळा बैठकांवरही जोर दिला आहे. महाआघाडीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी उत्तम फळी तयार केली असून, त्यांना मतदारांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे.
त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी स्वत: रत्नागिरीत येत असल्याने सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वच पातळीवर वेगाने प्रचार करण्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची सभा येत्या रविवारी (२८ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता शहरातील साळवी स्टॉपजवळील शासकीय जलतरण तलावाच्या शेजारील मैदानात होणार असून, यावेळी ठाकरे रत्नागिरीतील आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख (रत्नागिरी) नदीम सोलकर, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव बशीर मुर्तूझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, प्रदेश महासचिव (अल्पसंख्याक), राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, शहर अध्यक्ष नीलेश भोसले, विधानक्षेत्र प्रमुख राजेंद्र महाकाळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, कॉँग्रेस ओबीसी सेलचे दीपक राऊत, काँग्रेसच्या न्याय व विधी शाखेच्या अॅड. अश्विनी आगाशे, शिवसेना उपतालुका प्रमुख विजय देसाई, महिला संघटक साक्षी रावणंग, उपजिल्हा संघटक ममता जोशी यांच्यासह महाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सभेविषयी :
दिवस : रविवार, २८ एप्रिल २०२४
स्थळ : जलतरण तलाव मैदान, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
वेळ : संध्याकाळी ६ वाजता



