वाढीव मतदानाचे दान कोणाच्या पदरात?

– कोमल कुळकर्णी-कळंबटे
विधानसभेसाठी काल (२० नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघात मिळून साधारणपणे ६५.२३ टक्के मतदान झाले. २०१९ विधानसभा निवडणुकीत ६१.२२ टक्के इतके मतदान झाले होते. तुलनेने या निवडणुकीसाठी चार टक्के मतदान अधिक झाले आहे. त्यामुळे हे वाढीव मतदानाचे दान मतदारांनी कोणाच्या पदरात टाकले आहे, याची उत्सुकता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर हे पक्ष दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतांची गणिते बदलली आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणे ४८ हजारांचे मताधिक्य घेऊन खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघातून १९ हजार ६२७, रत्नागिरी मतदारसंघातून १० हजार ३७ आणि राजापूर मतदारसंघातून २१ हजार ४७१ असे एकूण या तीन विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत हे ५१ हजारांच्या फरकाने आघाडीवर होते. हा निकाल डोळ्यासमोर ठेवता रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही उदय सामंत यांना त्यांच्याच मतदारसंघात १० हजारांचा, तर चिपळूण मतदारसंघात आमदार शेखर निकम यांना सुमारे २० हजारांच्या फरकाने धोबीपछाड मिळाला. लोकसभा निवडणुकीतील मतांची हीच गणिते विधानसभा निवडणुकीसाठी काही प्रमाणात गृहीत धरून दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कसून तयारीला लागले आणि विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातून ४५ उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवत होते. असे असले तरी दापोली विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि ठाकरे शिवसेनेचे संजय कदम, गुहागर मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे राजेश बेंडल आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम, रत्नागिरी मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे आमदार उदय सामंत आणि ठाकरे शिवसेनेचे सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने, तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे किरण सामंत आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यातच मुख्य लढत होती.
काल झालेल्या मतदानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाकडून मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. मतदार जनजागृती मॅरेथॉन, मच्छीमार बोट रॅली यांसह ठिकठिकाणी बॅनर, घोषवाक्य, मतदानासाठी आवाहन करणारे व्हिडीओ आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याला मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करत प्रतिसाद दिला. तरुणांसह वृद्धही उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी आश्वासक असेल असे चित्र होते. मात्र जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा दिलेल्या आकडेवारीत जिल्हाभरात ६५.२३ टक्के मतदान झाल्याचे समोर आले. ही टक्केवारी २०१९ च्या तुलनेत चार टक्क्यांनी अधिक आहे.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाचा विचार करता सध्या गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर हे तीन मतदारसंघ महाविकास आघाडीकडे, तर दापोली आणि चिपळूण दोन मतदारसंघ महायुतीकडे जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत मतदारसंघनिहाय सविस्तर घेतलेला मागोवा..

दापोलीत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते डॉ. विनय नातू यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी गुहागरसह दापोली मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम न करण्याची भूमिका घेतली होती. तसेच हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आमदार योगेश कदम यांनी केलेली वक्तव्ये याचा फटका दापोलीत योगेश कदम यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याउलट माजी आमदार संजय कदम यांना ठाकरे सेनेच्या पारंपरिक मतांसह मुस्लिम समाजाची मतेही पदरात पडण्याची शक्यता असल्याने काही दिवसांपूर्वी जड वाटणारे आमदार योगेश कदम यांचे पारडे आता संजय कदम यांच्या बाजूने झुकेल असे चित्र दिसत आहे.

गुहागर मतदारसंघात शिवसेना नेते आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. जाधव हे मूळचे तुरंबव (ता. चिपळूण) येथील असले तरी त्यांनी चिपळूण बरोबरच गुहागरही काबीज केला आहे. गुहागर मतदारसंघात त्यांच्यासमोर शिंदे शिवसेनेकडून राजेश बेंडल हे उभे आहेत. बेंडल हे कुणबी समाजाचे नेतृत्व करत असल्याने त्यांना १०० टक्के समाजाची साथ मिळेल असा विश्वास आहे. संपूर्ण जिल्ह्यात पेंडल हे कुणबी समाजाचे एकमेव उमेदवार असल्याने या गोष्टीचा फायदा उचलत त्यांनी समाज बांधवांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरीही भास्कर जाधव हे या मतदारसंघातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले लोकप्रतिनिधी आहेत. यांच्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याबरोबरच त्यांची काम करण्याची पद्धत, कामाची गती, शब्द दिल्यानंतर तो पाळण्याची सवय, पक्ष किंवा समाज न बघता समोरच्यासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे ते इथल्या प्रत्येक मतदाराच्या मनात आहेत. त्यामुळेच स्वतः निवडणूक लढवत असतानाही ते स्वतःच्या मतदारसंघ सोडून ते संपूर्ण महाराष्ट्रात इतर उमेदवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून फिरत होते. मला माझे मतदारच निवडून आणतील, तेच माझा प्रचार करतील असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांवर टाकला. त्यामुळे या मतदारसंघातून भास्कर जाधव हेच पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील, चित्र दिसत आहे.

चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव हे निवडणूक लढवत आहेत. निकम या मतदारसंघातील काम चांगले असल्याने तसेच प्रत्येक मतदाराची ते वैयक्तिक पातळीवर दखल घेत असल्याने त्यांना मानणारा येथे मोठा वर्ग आहे. असे असले तरीही निकम यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेल्यामुळे अनेक मतदारांमध्ये नाराजी ही आहे. राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व असलेले शरद पवार हे कै. गोविंदराव निकम यांना आपला राजकीय वारस मानत. त्यामुळे त्यांचे चिरंजीव शेखर निकमही आपल्या वडिलांचा वारसा चालवतील ही मतदारांची माफक अपेक्षा होती; मात्र सत्तेत राहून लोकांसाठी काम करणार ही भूमिका घेत आमदार निकम यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांचा हात धरला आणि स्वतःच्या मतदारसंघातील मतदारांचा रोष ओढवून घेतला. हीच दुखरी नस पकडत नवखा चेहरा असलेल्या प्रशांत यादव यांनी या मतदारसंघात आपले बस्तान बसवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात पाय रोवले आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून ते या मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचले. ग्रामीण भागातील पशुपालकांच्या दुधाला योग्य तो दर देत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. आज प्रशांत यादव यांना मानणारा वर्ग येथे तयार झाला असल्याने हा मतदारसंघ नेमका कोण काबीज करणार, यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

रत्नागिरी मतदारसंघाचा विचार करता विद्यमान आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत हे गेली २० वर्षे ह्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा लढवली. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीपासून ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येत आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत सत्तेत राहून रत्नागिरीत विकासकामांसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कॅशलेस हॉस्पिटल या कामांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या आणि यांच्यासारख्या अनेक विकासकामांच्या जोरावर ते या मतदारसंघावर पुन्हा आपला दावा करत आहेत. ते आपली पाचवी टर्म लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजप पक्षात ३९ वर्षे प्रामाणिकपणे काम केलेले ज्येष्ठ नेते बाळ माने यांचे कडवे आव्हान आहे. भाजप-सेना युतीत असल्यापासून बाळ माने हे शिवसेनेसाठी काम करत असल्याने त्यांना शिवसेना पक्ष हा परका वाटत नसून आपल्यावर बाळासाहेबांचेच संस्कार असल्याचे सांगत इथल्या पारंपरिक ठाकरे सेनेच्या मतदारांना साद घालत आहेत. बाळ माने यांना दिलेल्या उमेदवारीवरून ठाकरे शिवसेनेतही नाराजी नाट्य घडले; अनेकांनी निष्ठावंतांना डावलल्याच्या घटनेचा निषेध करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला; मात्र कडवे आणि निष्ठावान शिवसैनिक सेना पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानत बाळ माने यांच्या पालखीचे भोयी झाले. या निवडणुकीत त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला असून “परिवर्तन पाहिजे” हे स्लोगन वापरत ते मतदारांपर्यंत पोहोचले आणि त्यांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून बाळ माने यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

राजापूर मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी यांची एकहाती सत्ता आहे. गेली १५ वर्षे ते या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राजन साळवी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांना आपले दैवत मानून त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला; मात्र या निर्णयामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यात ईडीची कारवाई, इन्कम टॅक्सची रेड यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या सगळ्यात आमदार साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचीही फरपट झाली; मात्र तरीही न डगमगता किंवा पक्ष बदल न करता ते ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्यातला हाच कडवा शिवसैनिक ते निष्ठावान असल्याचा द्योतक आहेत. या मतदारसंघातून त्यांना शिंदे शिवसेनेचे नेते आणि उद्योजक किरण सामंत यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे आव्हान आहे. राजापूर मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेनेला सोडल्यानंतर काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी करत काँग्रेस पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यातील काँग्रेस पक्षाकडून भरलेला अर्ज अवैध ठरल्याने तो बाद झाला; मात्र अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज त्यांनी मागे न घेतल्याने ते या शर्यतीत असल्याचे स्पष्ट झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत साळवी यांना काँग्रेस पक्षाकडून अविनाश लाड यांचे आव्हान होते. यात त्यांनी आमदार साळवी यांच्या पाठोपाठ दोन नंबर क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे लाड हे निवडणुकीत ताकदीचे उमेदवार आहेत. त्यात ते कुणबी समाजाचे नेतृत्व करत असल्याने त्यांना समाजाचा पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे. उद्योजक किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र ही उमेदवारी बंधू किरण यांना मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणाऱ्या उदय सामंत यांच्या पदरी निराशा आली आणि आयत्या वेळी नारायण राणे यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार त्यांना शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असून गेल्या काही महिन्यांपासून ते या मतदारसंघात काम करत आहेत. किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा हिने हा मतदारसंघ आपल्या वडिलांसाठी पिंजून काढला असून त्यांच्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून किरण सामंत विरुद्ध आमदार राजन साळवी यांच्यात मुख्य लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असला, तरीही ग्रामीण भागातला ठाकरे शिवसेनेचा मूळ पारंपरिक मतदार हा हलला नसल्याने याच मतदारांच्या जीवावर आमदार साळवी हे आपण या मतदारसंघात पुन्हा निवडून येऊ असा दावा करत आहेत. शिंदे शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत आणि उमेदवार अविनाश लाड यांच्या तुलनेत आमदार साळवी हे उजवे असल्याने त्यांच्या जागेला धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही किरण सामंत यांनीही हा मतदारसंघ चांगला बांधला असल्याने तेही या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात अशी ही शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीला पक्ष फुटीची किनार असली तरीही ह्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पाचही मतदारसंघातील टक्केवारी ही २०१९ च्या तुलनेत दोन ते पाच टक्क्यांनी वाढलेली आहे. वाढलेले टक्केवारीचे प्रमाण हे नेहमी प्रस्थापितांना धोकादायक मानले जाते. बदल हा अटळ मानला जात असला तरीही काही गोष्टी नेहमी अपवाद ठरतात. ह्या सगळ्या शक्यतांचा विचार करता रत्नागिरीकरांनी आपले वाढीव मतांचे दान कोणाच्या पदरात टाकले आहे हे २३ तारखेलाच समजेल.


