अशा लाल मातीतआर्टिकलराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

निकम ते यादव नैतिक अधिष्ठानाची कसोटी!

– अभिजीत हेगशेट्ये, ज्येष्ठ पत्रकार

राजकारणात प्रामणिकपणा, नैतिकता, सचोटी, पक्षनिष्ठा या शब्दांना आणि मुलभूत मूल्यांना आज महत्त्व राहिले नाही. त्या पाळण्याबाबत असणारा सृजनशीलता आणि संवेदनशीलता या मूलभूत घटकांना केव्हाच तिलांजली देण्यात आली आहे. आयाराम गयाराम आणि त्याहीपेक्षा सत्तेच्या परिघासाठी वाट्टेल ते हिच परिभाषा बहुतांश राजकीय नेतृत्वांची आणि त्यांचा कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे नितिमत्ता आणि वैचारिक मुल्याधिष्ठता वगैरे सारेच झूट मानले जाते. या वावटळीतही महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघात आणि गद्दारी या विषयावर २०२४ ची निवडणूक केंद्रित झाली आहे. यातील चिपळूण विधानसभा हा महाराष्ट्रातील एक आदर्श नमुना म्हणून मानला जाणार आहे.

चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा गेली दोन दशके शिवसेनेचा बालेकिल्ला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम येथून सदानंद चव्हाण यांच्यापेक्षा २९,९२४ चे मताधिक्य मिळवून विजयी झाले. यात त्यांची गेल्या ७ वर्षांची मेहनत होती. त्यांचे वडील गोविंदराव निकम यांचे चिपळूण आणि संपूर्ण जिल्ह्यातील सहकार, शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील अभूतपुर्व योगदान, याची पुण्याई त्यांच्या मागे होती. सह्याद्री शिक्षण संस्थेचा अवाढव्य कारभार आणि तो उभारण्यासाठी मा. शरदचंद्र पवार यांनी गेल्या ५० वर्षांत गोविंदराव निकम आणि त्यांच्या कुटुंबीयांना केलेले सहकार्य याचा सहभाग सर्वाधिक मोठा होता. कोकणातील शरद पवार यांचे सर्वाधिक विश्वासू कोण असा ज्या ज्या वेळी प्रश्न उभा राहिला त्या त्या वेळी गोविंदराव निकम आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून शेखर निकम हेच नाव समोर असे. असे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध असताना ना. अजितदादांसोबत शेखर निकम हे शरद पवार यांची साथ सोडून बाहेर पडले. त्यावेळी साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. मतदारसंघ, तेथील विकास आणि निधीसाठी सत्तेसोबत गेलो, असे ते समर्थन करत राहिले. लोकसभेच्या निवडणुकीत शेखर निकम यांनी भाजपच्या उमेदवारांचे अत्यंत जोरदारपणे काम केले. स्वतः संपूर्ण मतदारसंघात साऱ्या आयुधांसह आपल्या कार्यकर्त्यांना वाडीवस्तीवर भेटत प्रचार करत राहिले; मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. ज्या राजकीय पक्षाच्या झेंड्यावर निष्ठा ठेवत ते निवडून आले होते, त्यावर दाखविलेला अविश्वास मतदारांना सहन झाला नाही. २०१९ साली २९,९२४ मतांची आघाडी देणाऱ्या मतदारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत २० हजारचे उणे मताधिक्य देत मोठा धक्का दिला. याचा अर्थ विधानसभेचा विचार करता ५० हजार मतांचा तोटा झाला.

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचा पक्षाशी अविश्वासाची दखल पक्षप्रमुख शरद पवार यांनी अत्यंत गांभीर्याने घेत पर्यायांची चाचपणी करत ताकदीचा उमेदवार प्रशांत यादव यांना या मतदारसंघातून मधून उभे केले. उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या तयारीचा चिपळूण येथील पक्षाचा मेळावा अत्यंत भव्य स्वरूपात होता. २० हजारांपेक्षा अधिक उपस्थिती असणाऱ्या या मेळाव्याने चिपळूण, संगमेश्वरवासियांचे डोळे दीपून गेले. विरोधकांना धडकी भरविणारा आणि विजयाची तुतारी फुंकणारा असेच जणू या मेळाव्याचे स्वरूप होते. या मेळाव्याच्या निमित्ताने चिपळूण आणि परिसरात पूर्ण दिवस मुक्काम करत अनेकांच्या भेटी-गाठी घेत प्रशांत यादव यांच्यासाठी मोठे सकारात्मक वातावरण तयार करण्यात ना. पवार यशस्वी ठरले.

पी. के. सावंत, राजाराम शिंदे, निशिकांत जोशी, बापू खेडेकर,भास्कर जाधव अशा मान्यवरांनी गाजविलेला हा विधानसभा मतदारसंघ. यातील २०२४ ची विधानसभा निवडणूक मोठी रोचक आणि चित्तथरारक आहे. शेखर निकम यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील त्रुटी काय? हा प्रश्न आहे. त्यांच्यावर टिका काय करावी? हा प्रश्न विरोधकांना पडेल. फार मोठा, गाजावाजा करणाऱ्या विकासकामांचा भव्य प्रकल्प त्यांनी नसेल आणला; मात्र पुरग्रस्त चिपळूणपासून प्रत्येक खेड्यात ते पोहोचले आहेत. सह्यादद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. त्यांच्या विरोधातील मुख्य मुद्दा नैतिक अधिष्ठानाचा! विरोधकांच्या मते गद्दारी…

त्यांच्यासमोरील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा उमेदवार प्रशांत यादव हे तर राजकारणातील नवा चेहरा. गेली काही वर्षे ते कोकणात आणि विशेषतः चिपळूण परिसरात दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठ नेटवर्क उभारले आहे. रोजचे ३२ हजार लिटर दूध जमते. त्यावर प्रक्रिया होतात आणि दूध उत्पादक शेतकऱ्याला योग्यप्रकारे दूध दर मिळतो. शेकडो कुटुंबे त्यांची सदस्य आहेत. कोकणातील हा पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो. त्यांचे सासरे सुभाषराव चव्हाण यांची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था. या पतसंस्थेच्या खेड्या-पाड्यातून विस्तारलेल्या प्रचंड शाखा, फार मोठे नेटवर्क आणि सोबत महाविकास आघाडीची जबरदस्त जनशक्ती. अत्यंत अटीतटीची ही लढत वैचारिक अधिष्ठान, नैतिकता, प्रामणिकपणा निष्ठा या मुद्यांवर लढली जात आहे. कोण विजयी होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही; मात्र संपूर्ण जिल्ह्यातील तात्विक आणि नैतिक मुद्यांवर होणारी ही आगळी आणि वेगळी निवडणूक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button