मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

रत्नागिरीतील अपक्ष उमेदवार ज्योतीप्रभा पाटील यांचा दहावा मुद्दा वेधून घेतोय सर्वांचे लक्ष

आतापर्यंत घेतलेली पेंशन व्याजासकट शासनाला परत करण्याचे उर्वरित उमेदवारांना थेट आव्हान : मतदारही आकर्षित

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचा जोरज्वर आता चांगलाच चढला असून मतदानासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील यांनी नुकताच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात त्यांचा दहावा मुद्दा सर्वच मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. आमदार झाल्यास, आमदारकीचे पेंशन घेणार नाही असे स्पष्ट करतानाच हे आजी-माजी आमदार असलेल्या इतर उमेदवारांनी घोषित करावे आणि आतापर्यंत घेतलेली पेंशन व्याजासकट शासनाला परत करावी. मी राजकारण सोडीन, असे थेट आव्हान बाकीच्या उमेदवारांना दिले आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून  माचिस या चिन्हावर ज्योतीप्रभा पाटील निवडणूक अपक्ष लढवत आहेत. प्रचारासाठी त्यांनी सोशल मीडियाचे प्रभावी माध्यम निवडले असून लाखो मतदारांपर्यंत ते पोहोचत आहेत. ज्योतीप्रभा पाटील हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांनी सोशल मीडियाद्वारेच प्रचाराला सुरुवात केली असून नुकताच त्यांनी आपला दहा मुद्दे असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यातील शेवटचा मुद्दा सर्वच उमेदवारांचे विशेषतः तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहे. आमदार झाल्यास, आमदारकीचे पेंशन घेणार नाही असे त्यांनी यात नमूद केले असून समाज माध्यमाद्वारे मतदारांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मतदारांमधून कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट दिसत आहे. पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, मी ज्योतीप्रभा पाटील, वय २७ वर्षे. माझे पिताश्री, श्री. प्रभाकर पाटील, यांनी भारत संचार निगमच्या माध्यमातून सन २०२० पर्यंत जनतेची सेवा केली आहे, आणि माझी मातोश्री, डॉ. राधाराणी पाटील, या ‘ज्योती आय केअर’ नामक डोळ्यांच्या दवाखान्यातून आजही सेवा देत आहेत. माझे शिक्षण इंदिरा गांधी युनिव्हर्सिटीमधून बी.ए. (पॉलिटिकल सायन्स) आणि युरोप नेदरलँड्समधील International Institute of Social Studies या कॉलेज मधुन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मध्ये मास्टर्स केले आहे. मी आम आदमी पक्षाचा रत्नागिरी अध्यक्ष आहे, आणि माझे आदर्श मा. अरविंद केजरीवाल आहेत.

मागील ३ वर्षांपासून, आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न आणि शासनाने केलेल्या कामांचा दर्जा यांचा आढावा घेत, आपल्या भागातील आवश्यक सुविधा आणि विकासासाठी एक अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे कार्यरत आहे. माझा छंद लोकसेवा करणे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आपला आमदार होण्यासाठी, मी अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणूक लढवित आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपल्या समर्थनासाठी “माचिस” हे चिन्ह घेऊन निवडणुकीस उभा आहे, आपल्या कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत मागत आहे.

पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेले मुद्दे असे आहेत : १) रत्नागिरी मतदार संघात कायम स्वरूपाचे युरोपियन स्टैंडड रस्ते, पुर्ण शहरात फुटपाथ, घर तेथे पाणीपुरवठा आणि वीज उपलब्ध करून देणार, सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी रात्र निवारा केंद्र उभारणार. २) रत्नागिरी शहरात बस स्टैंड, बस थांबे, वाहन पार्किंगची सुविधा, घनकचरा निवारण केंद्र, सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे आणि प्रक्रिया प्रकल्प. ३) तसेच दिवस-रात्र नागरी वाहतूक सेवा उपलब्ध करून परफेक्ट रत्नागिरी शहर घडवणार. रत्नागिरी मतदार संघागत शैक्षणीक व वैद्यकीय सेवेचा कायापालट दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या मार्गदर्शना खाली करणार. ४) रत्नागिरीतील पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटन व्यवसायाला चालना देऊन नविन रोजगार, बाजार पेठ निर्माण करणार आणि रत्नागिरीला पर्यकटांची पहिली पसंद करून रत्नागिरीला पर्यटकांची राजधानी बनवणार. ५) रत्नागिरी मतदार संघात आंबा, काजू, फणस, रातांबा यांसारख्या फळांसाठी विशेष बाजारपेठ उभारणार, तसेच प्रक्रियाद्वारे उत्पादन विक्रीसाठी राज्यस्तरीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार. ६) मच्छीमारांसाठी मिरकरवाडा येथील जेटीचे आधुनिकीकरण करून कोल्ड स्टोरेज, इंधन केंद्र, आणि स्वयंचलित यंत्रसामग्रीसह आधुनिक सर्व सोयीनियुक्त मच्छी बंदर जेटी उभारणार. ७) रत्नागिरीतील तरुण शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात मुंबईत जातो, त्यांचे करीता मुंबईतील नोकरी रत्नागिरीत आणणार, दरवर्षी ३००० नोकरीच्या संधी उभारणार. ८) मागील काळात गुणवत्ताहीन सार्वजनिक कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकारी, लोक प्रतिनिधीवर विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार. ९) कायम रखडलेले प्रश्न अंगणवाडी, आशाताई सेविका, बचत गट, कंत्राटी कामगार, फेरीवाले, छोटे मच्छीमार, एसटी कर्मचारी, ऑटो रिक्षा, सावकारी कर्जदार, वैद्यकीय व्यवसायिक, हायकोर्टाची कोकण बेंच या बाबतचे प्रश्न पहिल्या १०० दिवसांत कायम स्वरुपी सोडविणार. १०) आमदार म्हणून निवडून आल्यावर एका महिन्यात आमदार एक खिडकी योजना सुरू करणार, तेथे सर्व शासकीय योजनांचा लाभ, नागरिकांना भ्रष्टाचार विना थेट मिळवून देणार. आमदार झाल्यास, आमदारकीचे पेंशन घेणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button