अशा लाल मातीतआर्टिकलविधानसभा निवडणूक २०२४

रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी राजकीय नेतृत्व

– अभिजीत हेगशेट्ये

त्या त्या प्रदेशाचा विकास, प्रगती, रोजगाराच्या संधी, शिक्षण संधी याची चर्चा निवडणुकीच्या वेळी सुरू होते. तशीच चर्चा रत्नागिरी जिल्ह्याच्या मतदार आणि इथे उभे असणारे उमेदवारही करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रत्येक निवडणुकीत राज्याचे म्हणजेच सर्वसामान्यांच्या उन्नती आणि विकासाचे निर्णय घेण्यासाठी विधानसभा प्रतिनिधी निवडून जातात. विद्यमान रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता येथील राजकारणावर १९६७ काळापासून चिपळूण येथील राजकीय नेतृत्वाचा प्रचंड प्रभाव होता. पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा एक होता. त्या काळातही रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी होती; मात्र विधानसभेतील राजकीय नेतृत्वात चिपळूणचे नेतृत्व हे वैचारिक आणि राजकीय पातळीवर अधिक प्रभावी होते. त्यामुळे चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासातील मध्यवर्ती ठिकाण होते.

शामराव पेजे

१९६२ च्या पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, माखजन, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर असे ९ विधानसभा मतदारसंघ होते आणि प्रत्येक मतदारसंघातील मतदार २५-३० हजारांच्या संख्येने होते. आज या ९ च्या जागी ५ विधानसभा मतदारसंघ झाले आणि प्रत्येक मतदारसंघातील मतदार अडीच- तीन लाखापर्यंत पोहोचले. पहिल्या निवडणुकीत स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेससोबत असणाऱ्यांचा मोठा प्रभाव होता. त्यावेळी रत्नागिरीतील खासदार होते मोरोपंत जोशी, आमदार होते पी. के. सावंत, शामराव पेजे, रामचंद्र बेलोसे, रिळकर गुरुजी, भाई शेट्ये, हुसैन दलवाई आदी… यांतील पी. के. सावंत यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात मोठा सन्मान आणि शब्द होता. मंत्रिमंडळात त्यांचे वर्चस्व होते. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येत होते. त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाचे कोकणसाठी असणारे योगदान म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ. आज बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणची शान आहे. महाराष्ट्रातल्या चार कृषी विद्यापीठापैकी हे एक. संशोधन आणि प्रत्यक्ष शेतात संशोधन पोहोचविण्याचे काम हे विद्यापीठ उत्तम पद्धतीने करत आहे. पी के. सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला तो अनमोल ठेवा मानावा लागेल.

त्याचकाळात चिपळूणमधील प्रभावी राजकीय नेतृत्व होते ते राजाराम शिंदे. अत्यंत लोकप्रिय असा अभिनेता. त्या काळात त्यांची मंदार नाट्य संस्थेची नाटके त्यातील शिंदे यांचा अभिनयासाठी तरुणाई वेडी झाली होती. महाराष्ट्रातून त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभत होता. कोकणच्या भूमितील हा ज्येष्ठ अभिनेता चिपळूण विधानसभा मतदारसंघातून १९७८ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आला. त्यांची नाट्य क्षेत्रातील झगमगती प्रतिमा कोकण विकासाच्या कार्यात विशेष प्रभावी झाली नाही; मात्र मंदार एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी पोफळी येथे उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार झाले. याच काळात बेस्ट कामगार संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ जाधव हे संगमेश्वर मतदारसंघातून निवडून आले. मंत्रिमंडळाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांचे असणारे उत्तम संबध आणि बांधकाम खाते कोकणला पहिल्याचवेळी मिळाले याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर झाला.

रवींद्र माने

रत्नागिरी जिल्ह्यातील आणि त्याहीपेक्षा संगमेश्वर, लांजा तालुक्यातील खेड्या-पाड्यातील दुर्गम भागातील रस्ते त्या काळात मोठ्या प्रमाणावर झाले. आजही त्या रस्त्यांची प्रत उत्तम आहे. हे त्यातील विशेष मानावे लागेल. त्यांच्यानंतर रवींद्र माने यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे विशेष विश्वासातील म्हणून आपला प्रभाव रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री म्हणून प्रस्थापित केला.

निशिकांत जोशी

चिपळूणमधील आणखी एक अत्यंत बुद्धिमान आणि वलयांकीत नेतृत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निशिकांत जोशी. सागर या दैनिकाच्या माध्यमातून निशिकांत जोशी यांनी कोकणचे प्रश्न सातत्याने मांडले. ना. शरद पवार यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांची तिरकस, खोचक आणि लक्षवेधक लेखणीने अनेक कोकणच्या प्रश्नांना सभापटलावर आणले. कोकणच्या प्रश्नांची अचूक जाण असणारा नेता, १९८५ मध्ये त्यांना विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. त्याचा त्यांनी कोकणचे प्रश्न प्राधान्याने घेण्यात उपयोग केला. ते एमआयडीसीचे अध्यक्ष होते त्या काळात चिपळूण, लोटे, खेड एमआयडीच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान होते. एन्रॉन प्रकल्प यावा यासाठी ना. पवार साहेब यांच्यासोबत ते सतत आग्रही होते. आज चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक राजधानी मानले जाते. याचे मुख्य श्रेय निशिकांत जोशी यांच्या योगदानात आहे.

गोविंदराव निकम

चिपळूणमधील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावी नेतृत्व म्हणून माजी खासदार गोविंदराव निकम यांचा विचार करता येईल. कोणताही राजाश्रय, आर्थिक सबळता नसताना एक शिक्षक सावर्डे भागात खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था उभारत संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळांचे जाळे उभारतो. त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांसोबत नाते जोडणे आणि विविध शासकीय योजना अत्यंत धाडसी प्रयोग माध्यमातून कोकण कृषी क्षेत्रात नवविचारांची बिजे रुजविण्याचे काम गोविंदराव यांनी केले. ना. शरद पवार हे गोविंदराव निकम यांना आपला कोकणचा वारस मानत असत. निकम यांना राज्य बँकेचे अध्यक्षपद देत कोकणसाठी मोठा सन्मान दिला होता. सह्याद्री शिक्षण संस्थेवर त्यांचे विशेष प्रेम होते. याच नातेसंबंधातून कोकणसाठी रोजगारहमी योजनेतून १०० टक्के सबसीडीच्या माध्यमातून कोकणात आंबा, काजूच्या शेकडो एकर बागा फुलल्या. आज कोकण फलोत्पादन क्षेत्रात अग्रेसर असण्याचे श्रेय ना. शरद पवार आणि ना. गोविंदराव निकम यांचे आहे.

आमदार भास्कर जाधव

आ. भास्कर जाधव हे चिपळूणातील वलयांकित नेतृत्व आहे. राजकीय क्षेत्रातील मतदारसंघ बांधणीचे त्यांचे कौशल्य विलक्षण प्रभावित करणारे आहे. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात आपले प्रभाव क्षेत्र आणि चाहतावर्ग असणारा हा एकमेव नेता आहे. राजकीय नेतृत्वाची संधी त्यांच्या प्रतिक्षेत आहे.

आमदार उदय सामंत

गेल्या दशकात जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा रत्नागिरीकडे कलली आहे. ती ना. उदय सामंत यांच्या अत्यंत प्रभावी आणि कार्यशील नेतृत्वामुळे. राजकारणातील शतरंज पटावरील मुत्सद्दी खेळी आणि उदय सामंत हे नाते कोकणसाठी आयडॅाल ठरत आहे. मुख्यमंत्री आणि राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाची भूमिका ना. उदय सामंत वठवित आहेत. आपल्याला मिळालेल्या राजकीय पदाचा वापर कोकणात सर्वाधिक निधी आणण्यासाठी सामंत प्रयत्नशील आहेत. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भविष्यात येणारे काही कोटींचे उद्योग यांची घोषणा, रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण या कामांची यादी मोठी आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. या निवडणुकीनंतर आजच्या धनकोच्या राजकारणातील संभाव्य उलथापालथीत कोकणच्या आणि रत्नागिरीच्या आमदाराचा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असेल याची चर्चा दिल्लीच्या राजकीय पटलावरही असते.

रत्नागिरी जिल्ह्याला राजकीय नेतृत्व प्रभावी लाभली; परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव किती असू शकतो, हा नेहमीच संशोधनाचा विषय आहे. सत्तेचा सारीपट हलविण्याची क्षमता ज्या भागात येते तेथेच विकासाची गंगा येते हा राजकारणाचा मुल फंडा मानला जातो. यापुढच्या काळात कोकणला ही संधी किती मिळेल हे या निवडणुकीचा निकाल सांगू शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button