मुख्य बातमी

झाडांना नुकसान पोचवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

दापोली वन विभागाची कारवाई : जेसीबी जप्त

दापोली : जेसीबी मशिनच्या साहाय्याने जमिन खोदताना मुळातून खोदून काढलेली ऐन, पांगारा ही झाडे राखीव वनक्षेत्रात ढकलून देऊन वनातील ५ झाडांना इजा पोहोचवल्याप्रकरणी जेसीबी ऑपरेटर आणि जमिनमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेसीबी ऑपरेटर हिरालाल रामेश्वर मेहता, (सध्या रा. नवानगर ता. दापोली) तसेच जमिनमालक अन्वर महम्मद सुर्वे (सध्या रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना दि. ११ नोव्हेंबर रोजी घडली. या दोघांवरही भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६ कलम (१) (एफ) (जे), ५२, ६५ (ए) नुसार वनपाल दापोली आर. डी. खोत यांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वन विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, दापोली परिमंडळातील नियतक्षेत्र ताडील मधील मौजे. ताडील, फॉ. स.नं. १७४ क्षेत्रालगत असणारे स.नं. ६१/१४३ जमिनदार यांनी जेसीबी मशिनच्या साहाय्याने जमिनीमध्ये उत्खनन करत असताना मुळातून खोदून काढलेली ऐन, पांगारा झाडे राखीव वनक्षेत्रात ढकलून देऊन वनातील ५ झाडांना इजा पोहोचवल्याचे आढळून आले. यात जेसीबी (क्रमांक MH 08 AX 7963) हा किंमत सुमारे ३५ लाख पंचनामा कागदपत्रे तयार करून जप्त करून ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई  दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील, दापोलीचे वनपाल आर. डी. खोत, ताडीलच्या वनरक्षक श्रीम. शुभांगी भिलारे, बांधतिवरेचे वनरक्षक सुरज जगताप, कोंगळेच्या वनरक्षक श्रीम. शुभांगी गुरव यांनी विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण), श्रीम. प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

सरकारी वनातील माती, मुरूम, औषधी वनस्पती, झाडांची चोरी, अतिक्रमण, प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत वनविभागास कळवावे आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्यास शासनास सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वन विभागाच्या टोल क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील यांनी वन विभागाच्या वतीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button