अशा लाल मातीत

पाचशे रुपयांत विधानसभा निवडणूक

– अभिजीत हेगशेट्ये 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत कोकणातील विधानसभा मतदारसंघावर महायुती आणि महाविकास आघाडी यांचा मोठा भर आहे. कोकणने बँ. नाथ पै ते प्रा. मधु दंडवते अशी चारित्र्य आणि वैचारिक अधिष्ठानाचे आदर्श महाराष्ट्र आणि देशाला दिले आहेत. याच जिल्ह्यातील लांजा विधानसभा मतदारसंघातील एक आदर्श आणि पुढील अनेक राजकीय नेत्यांना नैतिकतेचा आणि साधेपणाचा मानदंड देणारा आमदार आठल्ये गुरुजी होते.

१९६७ साली लांजा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ अत्यंत मान्यवरांनी आदर्शराजकारणाच्या चारित्र्याच्या एका उच्च सीमेवर नेलेला. आज लांजा तालुका राजापूर मतदारसंघात आहे, तर संगमेश्वर तालुका रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर या तीन मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यातील लांजा येथील अत्यंत चुरशीची आणि भविष्यात विविध आकड्यांचे उच्चांक मोडणारी तिरंगी लढत ही संपूर्ण कोकणातच एक उत्कंठावर्धक लढत आहे. या पार्श्वभूमीवर या मातीचे नाते कोणत्या राजकीय चारित्र्य आणि नैतिकतेशी जोडले आहे या इतिहासाच्या पानांकडे डोकावणे महत्त्वाचे आहे.

दूरदर्शनच्या मुलाखतीसाठी माजी आमदार आठल्ये गुरुजी यांच्या त्यांच्या देवळे येथील घरी गेलो होतो. बहुदा २००४ च्या विधानसभा निवडणुका होत्या. नदी पलीकडच्या छोट्या साकवावरून त्यांच्याकडे पोहोचलो. गोठ्यातील गाईला ते छोट्या तोटीच्या पाण्याने धुवत होते. खाकी लांब घोळाची हाप पॅन्ट आणि वरती बनीयन असा अगदी घरच्या पोषाखातच. “बसा, आलोच” म्हणत हात धुवत वरती खाकी बंडी चढवत ते आले.

त्या काळात कोकणातील राजकारणाला आर्थिक सक्षमतेची किनार येऊ लागली होती. प्रचाराची साधने अधिक विकसित झाली होती. मोटरसायकली अनेक घरांतून आल्या होत्या. काही घरे कार बाळगून होती. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बंद न पडणाऱ्या जीप गाड्या मिळत होत्या. कार्यकर्त्यांना बुथवर वडापाव हमखास मिळत होता. त्या काळात ते खूपच भारी वाटत होते. निवडणुकीच्या उमेदवारांचे खर्चाचे बजेट ५-६ लाखापर्यंत जात होते. उमेदवारांच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या; मात्र तरीही कार्यकर्ता हा प्रचारादरम्याने स्थानिक कार्यकर्त्याच्या घरीच रहात होता. हॉटेल संस्कृतीचा उदय मोठ्या प्रमाणावर झाला नव्हता; मात्र ती ही त्या काळातील चैन वाटत होती. यासाठी संपूर्ण विधानसभेत खाकी हाफ पॅन्ट आणि खाकी बंडी पोषाखात उभे रहाणारे आणि आपल्या अमोघ वक्तृत्वाने विधानसभेचे सभागृह गाजविणारे आठल्ये गुरुजी हे सभागृहातील एक अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्व होते.

त्यांचा एसटी डेपोवरील किस्सा फारच प्रसिध्द होता. त्याकाळात एसटीच्या टपावर रॅकमध्ये सामानाच्या बॅग्ज ठेवल्या जात. एसटी थांब्यावर अथवा स्टॅन्डला उतरताना प्रवासी त्या स्वतः एसटीवर चढून उतरून घेत अथवा त्यासाठी हमालाला बोलवत. एकदा लांजा स्थानकात आमदार आठल्ये उभे असताना एक प्रवासी आपले सामान काढण्यासाठी हमाल शोधत होता. समोर आमदार आठल्ये उभे होते. त्याला त्यांचा पेहराव हमालाचाच वाटला. त्यांनी तसे समजून त्यांना टपावरील सामान काढण्यास सांगितले. आमदार आठले यांनीही ते एसटीवर चढून काढले. पॅसेंजर पैसे देऊ लागला तेव्हा ते म्हणाले, मी लोकप्रतिनिधी आहे. तुझे काम झाले यात मला सर्वाधिक आनंद आहे.

आमदार आठल्ये गुरुजी यांचे वक्तृत्व अभ्यास आणि आमदार म्हणून कामाचा दबदबा साऱ्या महाराष्ट्रात होता; मात्र मला त्यांची त्या काळातील प्रचारयंत्रणा ते कसे राबत ही उत्कंठा होती. या प्रश्नाने ते अत्यंत दिलखुलासपणे बोलू लागले. चटईवर एका वर एक पाय ठेवून मांडी ठोकून बसत बोलण्याची त्यांची एक विशिष्ठ लकब होती. “ते सांगत होते… मी महिनाभर विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी बाहेर पडत असे. सोबत एक धोपटी त्यात चार कपडे. निघण्याच्या दिवशीची भाकरी आणि भाजी. संपूर्ण लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातील गावातून मी पायी फिरत होतो. एका गावात तेथे गावकऱ्यांची भेट घ्यायची तेथून पुढे. दिवसाला ४-५ गावे करत असून पहाटे निघायचे. जेथे दुपार होईल तेथे तेथील घरात जी मीठ-भाकरी मिळेल ती खायची आणि पुढच्या गावाकडे प्रयाण करायचे. सोबत मोजकेच कार्यकर्ते असायचे. दिवस मावळतीला आला, अंधार झाला की ज्या गावात असू तेथेच एका घरात मुक्काम करायचा. त्यांच्या सोबतच जेवण रात्रीची एक मीटिंग. रात्री तेथील घरातील घोंगडी आणि धोपटीतली चादर की ताणून द्यायचे. पुन्हा पहाटे उठून पुढच्या गावाला असा महिना भराचा सलग कार्यक्रम असायचा. सोबत गावातील लोकांशी चर्चा करताना त्याचे प्रश्नही समजून घेत होतो. चालत संपर्क हा मुख्य होता.” आठल्ये गुरुजींना त्यावेळी विचारले होते, तुमचा विधानसभा निवडणूक खर्च किती येत असे? त्यावेळी, त्यांचे उत्तर होते. फक्त ५०० रुपये. असे हे पाचशे रुपयांत १९६७ साली निवडून आलेले आमदार एस. के. आठल्ये उर्फ आठल्ये गुरुजी यांना प्रजासमाजवादी पक्षातर्फे १९६७ च्या निवडणुकीत १६ हजार ६२० मते मिळाली, तर त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी एस. एस. सावंत यांना १२ हजार ५५६ मते मिळाली.

कोकणच्या या मतदारसंघानी सतत समाजवादी पक्षाची आणि विद्यमान सत्तेच्या विरोधात परिवर्तनाची साथ केली आहे आणि त्याचवेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला नैतिकता, चारित्र्य आणि मुल्याधिष्ठतेचे अधिष्ठान मिळवून दिले आहे. आजच्या परिस्थितीत हे आदर्श जपणे नव्या राजकीय नेतृत्वांसमोरील मोठे आव्हान आहे. आजची विधानसभा लढाई कोट्यवधी रुपयांच्या आतषबाजीची, तर आठल्ये यांची लढाई अविश्वसनीय अशा ५०० रुपयांची!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button