पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई तातडीने मिळावी
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्याकडे केली आहे.
सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी आदी भागात भात शेती कापणीला आली असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी श्री. सावंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांच्या कार्यालयाला भेट देऊन केली.
यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे आदी उपस्थित होते.



