गणपतीपुळे मंदिरात आजपासून दीपोत्सवाला प्रारंभ
महिनाभर दररोज सायंकाळी फक्त तेलाच्या दिव्यांनी मंदिर उजळणार

रत्नागिरी : तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात आज (१६ ऑक्टोबर) आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा चालणारा हा दिव्यांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात दररोज साजरा केला जाणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली.
या दीपोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी श्रींची पंचोपचार पूजा करून सायंकाळी ७ वाजता मंदिरातील सर्व विद्युत पुरवठा व रोषणाई खंडित करून फक्त तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर प्रकाशित करण्यात येते आणि आरती मंत्रपुष्पांजली सेवा सादर करण्यात येते. त्यावेळी दिव्यांचा मनोहारी झगमगाट आणि लखलखाट अनुभवता येतो. तद्नंतर प्रसादाचे वाटप करून त्या त्या दिवसाच्या दीपोत्सवाची सांगता होते.
महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाची जय्यत तयारी आणि सुसूत्र नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यामार्फत प्रतिवर्षी करण्यात येते. यामध्ये अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात, असे श्री. घनवटकर यांनी सांगितले.



