मुख्य बातमी

निवळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी : काल (१९ डिसेंबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निवळी-मालपवाडी येथील वसंत देमु मालप यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर पुढच्या दीड तासात बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो सुस्थितीत असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 

याबाबत वनविभागाकडून देण्यात आलेली सविस्तर माहिती अशी : १९ डिसेंबर रोजी मौजे निवळी येथील मालपवाडी येथे वसंत देमु मालप यांच्या मालकीच्या घर परसवातील कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशनमधील कर्मचारी श्रीमती रसिका सावंत यांनी वनरक्षक जाकादेवी यांना दूरध्वनी वरून कळविली. त्यानंतर तात्काळ रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी यांना याबाबतची माहिती देऊन घटनास्थळी तात्काळ पिंजऱ्यासह येऊन पाहणी केली. ही विहीर अंदाजे ६५ फूट खोल असून, यात बिबट्या पाण्यावर पोहत असल्याचे दिसून आले. तात्काळ दोरीच्या साहाय्याने चौफळा विहिरीत सोडून त्याचा आधार देऊन बिबट्याला सुरक्षित बसण्याची जागा करण्यात आली. त्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये पिंजरा सोडण्यात आला. साधारण अर्ध्या तासात बिबट्याने पिंजऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तात्काळ पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला जेरबंद करण्यातात आले.

त्यानंतर कोतवडे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कसाळकर यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून घेऊन तो सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे तीन वर्षांचा आहे. ही रेस्क्यूची कार्यवाही रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीसाठी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक राजेंद्र पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी (राजापूर) मंगेश पाटील, लेखापाल (रत्नागिरी) तानाजी पाटील, वनपाल (पाली) न्हा. सी गावडे, वनरक्षक (रत्नागिरी) श्री. प्रभू साबणे, वनरक्षक (जाकादेवी) शर्वरी कदम यांच्यासह गावच्या पोलीस पाटील सौ. पवार, पोलीस अधिकारी रुपेश भिसे, लक्ष्मण कोकरे, अनिकेत मोरे, महेश धोत्रे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. हा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button