कोकण रेल्वे मार्गावर २४ डिसेंबरपासून धावणार विशेष गाडी
२१ डिसेंबरपासून आरक्षणाला सुरुवात

रत्नागिरी : ख्रिसमस आणि हिवाळी हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक (टी) ते करमाळी स्पेशल (दैनिक) ही अतिरिक्त विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
याबाबत रेल्वेकडून देण्यात सविस्तर माहिती अशी : गाडी क्र. ०११४९/०११५० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (दैनिक) : गाडी क्रमांक ०११४९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी स्पेशल (दैनिक) ही लोकमान्य टिळक (टी) येथून २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११५० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (दैनिक) ही गाडी करमाळी येथून २४ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ कालावधीत दररोज सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
या प्रवासात ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. या गाडीची रचना एकूण २२ एलएचबी कोचचीअसून, यामध्ये संमिश्र (फर्स्ट एसी + २ टियर एसी) – १ कोच, २ टायर एसी – ३ कोच, ३ टायर एसी – १२ डबे, स्लीपर – २ कोच, जनरल – २, जनरेटर कार – १, एसएलआर १ यांचा समावेश असेल.
या गाडीसाठी २१ डिसेंबर रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उघडेल. या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.



