मुख्य बातमी

मासू ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा विषय गावात बसून मिटवू : सरपंच प्रकाश भोजने

आनंद भोजने व काही ग्रामस्थांचे उपोषण नियमबाह्य

गुहागर : गेले काही दिवस चर्चेत असलेल्या मासू ग्रामपंचायतच्या नवीन बांधकामाबाबत उपोषणास बसलेले आनंद भोजने व काही ग्रामस्थ यांचे उपोषणच नियमबाह्य आहे. गावातील प्रत्येक विकासकामाबाबत ग्रामस्थांची सभा घेऊनच बहुतांशी विषयांचे निर्णय घेतो. त्यामुळे हा ही विषय आम्ही गावात बसून मिटवू, असे सरपंच प्रकाश भोजने यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या मासू गावाच्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये मासुमध्ये चालू असलेल्या उपोषणाबाबत चर्चा करण्यात आली. मासू येथील रहिवाशी आनंद भोजने हे तेथील काही ग्रामस्थांची दिशाभूल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. विकास कामे करतेवेळी नजरचुकीने काही त्रुटी राहून जातात. त्याचा विपर्यास करणे चुकीचे. गाव सध्या एकोप्याने राहत आहे. येथे विकासकामे ही व्यवस्थित होत आहेत; परंतू उपोषणकर्ते आनंद भोजने काही ग्रामस्थांच्या मनात गैरसमज पसरवत आहेत. मात्र काही असले तरी गाव संपूर्ण एकत्र असल्याने आम्ही गावात बसून ग्रामपंचायतीचा विषय मिटवू, असे ग्रामस्थांमधून बोलले गेले.

गेले १८ महिने मी स्वत: ग्रामपंचायत नळपाणी योजनेचे पाणी सोडण्याचे काम विनामूल्य करीत आहे. या नळपाणी योजनेला पाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यक्ती तयार होत नसून येथे कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे; मात्र गावात सर्वांना सांगूनही कोणी तयार होत नाही. त्यामुळे मी स्वत: पाणी सोडत आहे. मी माझ्या कामानिमित्त कुठे बाहेर गेलो तरच पाणी सोडले जात नाही. तेही दोन विशिष्ट वाड्यांना वगळून सर्वाना सर्वांना मिळते, असे नाही तर या योजनेवर असलेल्या सर्वच पाणीधारकांना पाणी मिळत नाही, असे सरपंच प्रकाश भोजने यांनी सांगितले.

जुनी ग्रामपंचायत इमारत तोडून त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधणार होतो, असे गावात ग्रामस्थांशी चर्चिले होते; मात्र जुनी इमारत मोडल्यानंतर त्या जागेच्या मालकांनी पैशांची मागणी केली. त्यामुळेच पर्यायाने दुसरी जागा पाहायला लागली. तीही जागा गावामधील ग्रामस्थांशी चर्चा करून ठरवण्यात आली. त्यामुळे आनंद भोजने व काही ग्रामस्थांनी केलेले उपोषण हे चुकीचे आहे, असे सरपंच श्री. भोजने यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button