अशा लाल मातीतआर्टिकल

नव्वद टक्क्यांचा प्रश्न? राहुल गांधी कोकणात!!

देशातील नव्वद टक्के समाजाला देशाच्या शिक्षण, उद्योग, विकास, रोजगार, राजकारण यात  प्रतिनिधीत्वच नाही. निव्वळ पाच-दहा टक्केच समाज या देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधीत्व करत आहे. ही चौकट मोडली पाहिजे, असे मुलभूत प्रतिपादन कोल्हापूर येथील संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांनी केले. हा विचार थेट कोकणातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला लागू आहे. कोकणातील बहुजन समाज यादृष्टीने विचार करू लागला, तर येथील विद्यमान राजकीय व्यवस्थाच उध्वस्त होऊन, एक नवा आविष्कार आणि आयाम कोकणातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्थापन करू शकण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

विरोधी पक्ष नेते आणि सध्या देशातील युवकांचे सर्वाधिक आकर्षण असणारे राहुल गांधी या देशातील सामाजिक, राजकीय रचनेच्या सोशल इंजिनिअरिंगचे जे गणित मांडत आहेत ते थक्क करणारे आणि बहुजन समाजाला खडबडून जागे करणारे आहे. अतिविशाल अशा या संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांची एका युवकाने स्वतःच्या हाताने बनविलेल्या विठ्ठल रुकमाईच्या मूर्तीने स्वागत केले. हा कुंभार समाजातील मूर्तिकार युवक स्वप्नील कुंभार याच्या मूर्ती कौशल्याचे कौतुक करताना राहुल गांधी यांनी या देशात निर्माणाच्या हाताना कसे डावलले जाते आणि मागे फेकले जाते ते सांगत देशात मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी यांचा ९० टक्के वाटा असताना अर्थसंकल्पात या वर्गासाठी अत्यल्प तरतूद केली असल्याचे सांगताना जातिनिहाय जनगणनेचा आग्रह धरला.

नेमकी ही बाब कोकणसाठी आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाची आहे. आज येथील बहुजन समाजाला प्रश्न पडला आहे. आम्ही कोणाच्या पखाली वाहत आहोत आणि का? या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार विचार मंथन सुरू आहे. याची सुरवात मंडणगडपासून थेट राजापूरपर्यंत होत रहाते. रत्नागिरी जिल्हा हा कुणबी, भंडारी, माळी साळी यांचे वर्चस्व असणारा. या जिल्ह्यात कुणबी समाज ६० ते ६५ टक्के आहे. एकूण ओबीसी समाज ८० ते ८५ टक्के आहे; मात्र येथील सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत या बहुजन समाजाला उच्च समाजाने दूर फेकून दिले आहे. त्यांना विविध प्रकारची आमिषे देत सतेत लाचार करून ठेवले आहे आणि सत्तेच्या चाव्या उच्च समाजाच्या हातात आहेत. आज या जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेचे नेतृत्व करणारे खासदार, आमदार पाहिल्यास ते सर्व मराठा समाजाचे आहेत. त्याच्या समोरील प्रतिस्पर्धी ही मराठा समाजाचे आहेत, हे असे का? असा प्रश्न आज विशेषतः कुणबी, भंडारी, वैश्य आणि मुस्लिम ओबीसी समाजात चर्चिला जात आहे.

कै. शामराव पेजे यांच्या नावाने फार मोठे सभागृह बांधले जाणार आहे. त्यासाठी भूखंड, मोठा निधी इत्यादी गोष्टी आकर्षण देत कुणबी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होत आहे. मुत्सद्दी राजकारणात ते महत्त्वाचेही आहे; परंतु शामराव पेजे यांच्या कारर्किदीचा विचार करणे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. याचा विचार कुणबी समाजाच्या मध्यवर्ती विचार मंथनात होऊ लागला आहे. शामराव पेजे यांनी कुणबी समाजाला संघटीत केले. त्यांना कुळ हक्काच्या प्रश्नावर लढण्यासाठी ताकद दिली, शिक्षण दिले, समाजातील आपल्या शक्तीचे भान दिले. त्यामुळेच काँग्रेसच्या राज्यात शामराव पेजे खासदार होते. तर जिल्ह्यात शिवाजीराव जड्यार, लक्ष्मणराव हातणकर, तु. बा कदम, मामी भुवड, गंगाराम सकपाळ अशी कुणबी नेतृत्व होती. या काळात भाजपने रत्नागिरी येथे उमेदवार देतानाही कुणबी नेतृत्व शिवाजीराव गोताड यांना उमेदवारी दिली. हा बहुजन समाजाचा प्रचंड दबदबा होता, ताकद होती. चिपळूण लोकसभा मतदारसंघातून हुसेन दलवाई काँग्रेस प्रतिनिधित्व करत होते.

आणीबाणी नंतरचा जनतापक्षाचा काळात झालेला नवा बदल कॅांग्रेसची पिछेहाट आणि शिवसेना भाजपचा उदय या काळात मराठा राजकारणाने कोकणात उसळी मारली. खेडचे रामदास कदम, सूर्यकांत दळवी, भास्कर जाधव, जगन्नाथ जाधव, रवींद्र माने, सुभाष बने, आप्पा साळवी, राजन साळवी, संजय कदम हे सर्व मराठा नेतृत्व. यात उदय सामंत आणि विनय नातू हे उच्चवर्णीय नेतृत्व याचा अर्थ ८० टक्के बहुजन समाज असणारे त्या समाजातील नेतृत्व जिल्हाच्या राजकारणातून पूर्णतः फेकले गेले आहे. याचा विचार या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाची मोठी शक्ती आहे हा समाज संघटितही आहे; मात्र या समाजाला विविध आमिषे दाखवत फसविण्याचे व त्याचा निवडणुकीपुरता वापर करण्याचा प्रयोग यापूर्वी अनेकवेळा झाला आहे. या कारणाने या समाजाने स्वतःच्या नेतृत्वावर नाराजीही व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राजाभाऊ लिमये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ॲड. सुजित झीमण हे शिक्षण सभापती होते. कुणबी समाजातील भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख होत होता. एक अभ्यासू आणि मुत्स­द्दी नेतृत्व म्हणून त्यांना राज्य पातळीवरून संधी मिळाली नाही; मात्र उत्तम सहकारी बॅंक चालवित त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. त्या काळात नंदकुमार मोहिते आणि सुरेश भायजे हे कुणबी समाजाचे उमदे नेतृत्व होते. समाज त्यांना मोठ्या प्रमाणात मान देत होता. सुरेश भायजे यांनी संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत शिट्टी जोरदार फुंकली होती; मात्र आर्थिक पातळीवर ते टिकले नाहीत आणि त्याचा फायदा नारायण राणे यांनी उठविला. त्यांना सतत कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंडळ देतो वगैरे आमिषे दाखवत त्यांचा निवडणुकीसाठी वापर करून घेतला आणि प्रत्यक्ष सत्तेच्या प्रक्रियेत त्याना दूर फेकून दिले. आजही त्याच पध्दतीचे राजकारण सुरू आहे.

राहुल गांधी यांच्या सामाजिक आणि वैचारिक मांडणीचा राजकीय विचार करता आज राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अविनाश लाड यांना मोठी संधी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठे मतदान मिळविले आहे. यावेळी त्यांना संधी मिळणे, त्याच बरोबर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथे मुस्लिम ओबीसी समाजाला संधी मिळणे येथील जनाधाराचा विचार करता फार महत्त्वाचे आहे. तोच भाग चिपळूण, गुहागर आणि दोपोली, खेडमध्ये आहे. कोकण किनाऱ्यावरील भंडारी समाज यांना राजकीय क्षेत्रात जनसंख्या असून ही संधी नाही. हे सोशल इंजिनिअरिंग या निवडणुकीत जागा वाटप आणि उमेदवार यात कसे बसणार हा खरा सामाजिक न्यायाचा भाग रहाणार आहे. फक्त पैसा हाच निवडणुकीचा उमेदवार सक्षमतेचा निकष न ठेवता त्याला सामाजिक रिझर्वेशनची जोड देत सामाजिक न्यायाचा अधिकार मिळाला, तरच निर्णय प्रक्रियेत बहूजन जो ९० टक्के आहे तो येऊ शकेल. राहुल गांधी यांचे हे गणित कोकणात प्रत्यक्षात आणण्यासाठी राहुल गांधी यांनी कोकणात उतरणे गरजेचे आहे. त्यापेक्षा त्यांना कोकणात उरविण्यासाठी ९० टक्के समाजाने आग्रही रहाणे अधिक गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button