मुख्य बातमी

मासू गावात सरपंचांच्या मनमानीचा कळस

ग्रामस्थांनी स्वीकारला उपोषणाचा मार्ग : कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी

गुहागर : तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंचांबाबत वारंवार तक्रारी करूनही सरपंचांमध्ये बदल होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी कायदेशीर पद्धतीने मासू येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उपोषण केले. तसेच ग्रामपंचायत इमारत सुस्थितीत असताना पाडण्यात आली. ही इमारत निर्लेखित करताना म्हणजेच शासनाची इमारत पाडण्याची कोणतीही परवानगी न घेता इमारत तोडली. अशी मनमानी करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत इमारत मंजूर करणे कामी हा प्रस्ताव हा खोटी कागदपत्र जोडून केलेला आहे. अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत जागेचे बक्षीसपत्र नसताना जिल्हा परिषद मासू शाळा क्र. ३ शाळेच्या जागेचे बक्षीसपत्र जोडून शासनाची फसवणूक केलेली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तसेच शासनाची व ग्रामस्थ यांची फसवणूक करणारे तत्कालीन ग्रामसेवक व सध्याचे ग्रामसेवक, गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्यावर कायदेशीर कारवाही करून त्यांचे तत्काळ निलंबन करावे. त्याचे संदर्भीय पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. संबंधित ग्रामपंचायतीचा ठेकेदार यांनी ग्रामपंचायत तोडण्याची परवानगी नसताना तसेच निर्लेखनाची कोणतीही परवानगी नसताना इमारत तोडली आहे. त्यामुळे ही इमारत पूर्वस्थितीत बांधून द्यावी, व त्यांनी ती विनाकारण तोडली म्हणून त्यांच्यावर योग्य कारवाही करावी व हे सगळे बेकायदेशीर असताना ग्रामपंचायत मंजूर इमारत असलेल्या निधीतून कोणताही ग्रामपंचायत ठराव नसताना सुमारे २ लाख रुपये बेकायदेशीररित्या खर्च केले. ही रक्कम खर्च करणारे अधिकारी व अभियंता यांच्याकडून वसूल करावी तसेच त्यांच्यावरही कारवाई करावी. ही इमारत प्रस्तावित असलेल्या जागेवर मासू बौद्धवाडी येथे बांधण्यात यावी. हे ठिकाण ग्रामस्थांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे, असे उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सरपंचानी उपोषणकर्त्यांचे केले पाणी बंद

गावामध्ये चुकीच्या पद्धतीने विकासकामे होत असून अर्धवट असलेल्या कामांचे पूर्ण पैसे अदा करणे तसेच ग्रामपंचायतीचे चुकीच्या पद्धतीने चालू असलेले काम हे निदर्शनास आणून दिल्याने व याबाबत उपोषणाचा मार्ग अवलंबल्याने सरपंचांकडून येथील ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे. शासकिय योजनेचे पाणी चालू व बंद करण्याचे काम स्वत: सरपंच करतात. पाणी बंद केल्याने आम्हाला सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वरून डोक्यावरून पाणी आणावे लागते, असे उपोषणकर्त्या महिलांनी सांगितले.

स्मशानाशेजारी जंगलात नवीन इमारत

चुकीच्या पद्धतीने कागदपत्र शासनाकडे सादर करून जंगलामध्ये स्मशानाशेजारी ही इमारत बांधली जात आहे. या इमारतीचा पाया पूर्ण झाला असून सुमारे २ लाख रुपये यावर खर्च केले आहेत. या जागेचे बक्षीसपत्रही झालेले नसून शाळेजवळील दुसऱ्या जागेचे बक्षीसपत्र याला जोडले आहेत. वस्तीपासून इमारत लांब असल्याने येथील ग्रामस्थांना याचा मनस्ताप होणार आहे, असेही उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button