मुख्य बातमीराजकीय

चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात संगमेश्वर तालुक्याचाच उमेदवार असावा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेलाच डावलले जात असल्याची पदाधिकारी, शिवसैनिकांनी व्यक्त केली खंत

संगमेश्वर : संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघात संगमेश्वर तालुक्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी संगमेश्वर तालुक्यातील ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक आक्रमक झाले असून, ठाकरे गटाला डावलले जात असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी संगमेश्वर तालुक्यातील उमेदवार न दिल्यास ठाकरे गट संपण्याची भीती आणि शिवसैनिकांचा उद्रेक होण्याची शक्यता पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, सर्वसामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

संगमेश्वर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आरवली याठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ही खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संतोष थेराडे म्हणाले, संगमेश्वर तालुक्याला उमेदवारीसाठी गेली अनेक वर्षे डावलले जात आहे. संगमेश्वर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये आमदार सुभाष बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासारखे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यातून शिवसेनेला उमेदवारी देण्यात यावी. संगमेश्वर तालुक्याचा आमदार असावा अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे; मात्र उमेदवारीसाठी संगमेश्वर तालुक्याला डावलले जात आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची घुसमट होत आहे. त्यांच्या मनात वेगळी चीड निर्माण होत आहे. उमेदवारी न दिल्यास शिवसेनेतून वेगळा उद्रेक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेची ताकद असतानाही डावलले जात असल्याने तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मित्रपक्ष आपली मोटबांधणी करत असल्याची नाराजी श्री. थेराडे यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख नंदादीप उर्फ बंड्या बोरूकर म्हणाले की, संगमेश्वर तालुक्यामध्ये सुभाष बने, रवींद्र माने, संतोष थेराडे, रोहन बने, राजेंद्र महाडीक यांसारखे मातब्बर उमेदवार असतानाही शिवसेना डावलले जात असल्याचे सांगितले. शिवसेनेमध्ये कोणतेही पद नसताना आपण पक्ष वाढवण्याचे काम केले; मात्र विधानसभेसाठी गेली अनेक वर्ष संगमेश्वर तालुक्याला उमेदवार दिला जात नसल्याने आपला पक्ष आपल्या डोळ्यासमोर संपत जाईल की काय आहे याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमार्फत शिवसेना ठाकरे गटाच्या जास्त जागा आहेत. तसेच पक्षाने आपला झेंडा फडकवलेला आहे; मात्र विधानसभेसाठी उमेदवारी देत असताना संगमेश्वर तालुक्याला डावलले जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी सभापती सुभाष नलावडे यांनी संगमेश्वर तालुक्याला कोणीच वाली नाही असे चित्र दिसत असून, आतापर्यंत संगमेश्वर तालुक्यानेच उमेदवाराला २० हजारांचे मताधिक्य दिले असल्याची सांगितले. मित्रपक्षातून आपल्याला डावलले जात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

यावेळी संतोष थेराडे, सुभाष नलावडे, बंड्या बोरुकर, दिलीप सावंत, अरविंद जाधव, विजय कुवळेकर, अनंत गुरव, विष्णू विंजले, जगन्नाथ राऊत, किशोर जाधव, शशिकांत धामणस्कर, नीलेश भुवड, रामचंद्र हरेकर, चंद्रकांत जाधव, सुनील कातकर, प्रकाश घाणेकर, महेंद्र सुर्वे, प्रशांत विचारे, अनंत उजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button