भास्करोदय पर्व…

महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखा जवळ येऊ लागल्या तसे राजकीय डावपेच अधिक वेगवान झाले आहेत. या निवडणुकात कोकण प्रांतातील बदलांना आणि येथील वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या शक्ती राज्याच्या राजकारणात अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता असल्याने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या व्यूहरचना आखल्या जात आहेत. यात प्रत्यक्ष जेष्ठ नेते आणि राजकारणातील चाणक्य ना. शरद पवार थेट चिपळूणमध्ये आल्याने राजकीय रंग अधिक गहीरे झाले आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांच्या राजकीय पटलावर उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. या तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा त्यांना अनुभव आहे. त्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी त्यांनी दिला आहे आणि कोण कोठे प्रभावी ठरू शकेल याचा अचूक अंदाज ही आहे. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय पान आपल्या इच्छेबरहुकूम चालावे, अशी त्यांची मनस्वी इच्छा त्यातून रत्नागिरीचा बालेकिल्ला पाचव्यांदा सहज हस्तगत करतानाच शेजारील राजापूरमधून बंधुराजांना निवडून आणण्याची त्यांची व्यूहरचना आहे.
सांमत यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील खरे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत भास्करशेठ जाधव. शिवसेनेची बुलंद धडाडणारी तोफ म्हणून त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारंघातून पहिली आमदारकी मिळविली. जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेत्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. मधल्या काळात ते मातोश्रीवर नाराज होत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. तेथे त्यांना मोठा सन्मान मिळाला. राज्यसभेवर संधी, पक्षाचे अध्यक्षपद या काळात त्यांचा उदय सामंत यांच्यासोबत सतत संघर्ष होत राहीला; मात्र असा एक क्षण आला की ते उदय सामंत यांच्या प्रेमात पडले. उदय सामंत यांच्या राजकीय आराखडे आणि व्यूहरचना निश्चितच पुढील काळात राजकीय लाभाची आहे, असा त्यांना आभास झाला आणि भास्कर शेठ जाधव ना. उदय सामंत यांच्यासोबत राष्ट्रवादीतून थेट पुन्हा मातोश्रीवर शिवसेनेत पोहोचले. यावेळी राजकीय गणित काही वेगळेच झाले. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अशी अनपेक्षित राजकीय युती झाली. सामंत यांना महत्त्वाचे शिल्पकार म्हणून मंत्रीपद मिळाले आणि पक्षात नवे आलेले म्हणून सिनिअरमोस्ट असतानाही भास्कररावांची मंत्रीपदाची संधी नाकारली गेली.
या अनुभवातून आता भास्करशेठ अत्यंत सावध झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक आश्चर्यजनक राजकीय चमत्कार करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. त्यांचे अफाट संघटन कौशल्य आणि अमोघ वक्तृत्व या ताकदीवर त्यांनी संधी मिळताच भाजपचा पारंपरिक गुहागर विधानसभा मतदारसंघ कायमस्वरूपी स्वतःच्या वर्चस्वाखाली आणला. त्या पाठोपाठ शिवसेनेच्या पारंपरिक मानल्या जाणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघात संजय कदम (राष्ट्रवादी काँ.) निवडून आणले. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात प्रभाव असणारा हा एकमेव नेता मानला जातो. शिवसेनेच्या फुटीत मूळ शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यात आज आमदार भास्कर जाधव हेच जिल्ह्यातील शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत गुहागर, दापोली सोबतच चिपळूण मतदारसंघही आपल्याला मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
चिपळूण मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील कळीचा प्रश्न झाला आहे. येथील विद्यमान आमदार शेखर निकम यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजितदादांच्या गुलाबी पक्षात प्रवेश केल्याने त्यांचा थेट कार्यक्रम करण्याचा निश्चय ना. शरद पवार यांनी केला आहे. यासाठी ते स्वतःच कोकणात उतरले. या संधीचा अचूक फायदा घेण्यासाठी भास्कर जाधव यांनी आपल्या मुलातर्फे अजितदादांचे चिपळूण मध्ये स्वागत करत नवाच राजकीय चेंडू भिरकावला. जेव्हा प्रकरण फारच चर्चेत आले (अपेक्षेनुसार) त्यावेळी सर्वच मोठ्या राजकीय नेत्यांचे आपल्या भूमीत स्वागत करण्याची थोर राजकीय परंपरा आपण पाळतो म्हणत त्यांनी त्याला डावर्व्हटही केले. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले.
रत्नागिरी जिल्ह्यावर अधिपत्य गाजविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अधिराज्य असणे गरजेचे आहे. याची जाणीव त्यांना प्रकर्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने होऊ लागली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मागील चार टर्म उदय सामंत निवडून येत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता शिंदे शिवसेना असा त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास आहे. अफाट आणि मतदारसंघातील सातत्यपूर्ण संपर्क, रत्नागिरी शहरातील शैक्षणिक हब करण्याचे त्यांचे स्वप्न आणि त्यासाठी मेडिकल ते इंजीनियरिंग या माध्यमातून आणलेले विविध शैक्षणिक उपक्रम, ऐतिहासिक, सामाजिक महान व्यक्तीमत्वांचे पुतळे हे शहराचे वैशिष्ट्य बनविण्यातील एक शिल्पकार, कोट्यावधी रुपयांचा निधी या शहराच्या पाणी, रस्ते, वैद्यकीय सेवा यासाठी आणणारे आणि जनतेला लाभार्थी ठरणारे अनेक प्रकल्प थेट जनतेकडे पोहोचविणारे विद्यमान उद्योग मंत्री असा फार मोठा राजकीय आलेख असणारे नेतृत्व ना. उदय सामंत यांच्या समोर विधानसभा कोण लढणार? तर अद्याप कोणी उमेदवारच नाही अथवा तसा ताकदवर कोणी इच्छूकच नाही, अशी राजकीय क्षितिजावर परिस्थिती. काही नावे आतल्या गोठात चर्चिली जातात; मात्र टिकतील की मॅनेज होतील! अशी पाठोपाठ चर्चा होते. त्यामुळे ही निवडणूकच एकतर्फी होणार हे जणू अधोरेखितच, अशीच या विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आणि अखेरचा टप्पा आर्थिक क्षमतेचा! सामंत यांच्या आर्थिक क्षमतेसमोर कोणीच टिकू शकणार नाही. जसे उद्धव ठाकरे यांच्या राज्यात एकनाथ शिंदे होते. तोच रोल आज एकनाथ शिंदे यांच्या राज्यात उदय सामंतांचा आहे.
अशा सामंत यांना थेट टक्कर देण्याची व्यूहरचना भास्कर जाधव यांची आहे. यासाठी ना. उदय सामंत यांचे पारंपारिक विरोधक, माजी आमदार बाळ माने यांना रिंगणात उतरविण्याचा राजकीय डावपेच सुरू आहे. वास्तवात बाळ माने हे भाजपचे आहेत. त्यांच्या अणूरेणूत भाजप आहे. यापूर्वी तीन वेळा ते सामंत यांच्यासमोर पराभूत झाले आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माने यांच्यासाठी रत्नागिरी येथे जाहीर सभा झाली, तरीही माने पराभूत झाले होते; मात्र यावेळी बाळ माने यांना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांच्यासमोर उभे करण्याचा मानस आहे. यासाठी भास्कर जाधव यांनी माने यांना मातोश्रीवर भेट घडवून आणली. बाळ माने हे भास्कर जाधव यांचे जवळचे नात्यातले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीला १० हजारांचे मताधिक्य होते. याचा फायदा घेत यावेळी रत्नागिरी काबीज करण्याचा इरादा आहे. गुहागर, दापोली , चिपळूण आणि रत्नागिरी अशा चार मतदारसंघात भास्करशेठ जाधव आपला दावा सांगत आहेत. चारही जागा निवडून आणण्याचा उद्धव ठाकरे यांना अभिवचन देत आहेत. यांतील किमान तीन मतदारसंघ त्यांच्या नेतृत्वाने लढले जातील आणि नवा भास्कोरोदय रत्नागिरीत अवतरेल असा राजकीय व्यूहरचनेचा नवा भाग समोर येण्याची शक्यता आहे.


