Uncategorized

चिपळूणमधील बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रहदारीचा मार्ग शनिवारी १ ते ८ बंद

रत्नागिरी : वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिपळूण येथील बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा मार्ग उद्या (शनिवार, २१ सप्टेंबर) रोजी दुपारी १ ते रात्री ८ यावेळेत बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून बहाद्दुरशेख नाका पॉवर हाऊस – चिंचनाका तसेच चिंचनाका पॉवर हाऊस बहाद्दुरशेख नाका या मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज (२० सप्टेंबर) दिले आहेत.

मोटार वाहतूक बंद करण्याबाबत आज प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चिपळूण पोलीस ठाणे हद्दीमध्ये संभाव्य दौरा नियोजित आहे. या वेळी बहाद्दुरशेख नाका ते जिप्सी कॉर्नर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार असून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात सभा होणार आहे. या सभा व रॅलीस वेळी सुमारे ५ हजार ते ६ हजार जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे समजून येते. अतिमहत्वाच्या व्यक्ती, सभा व रॅली कार्यकमाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बहाद्दुरशेखनाका ते चिंचनाका रोड हा चिपळूण शहराचा मध्यवर्ती रोड असून या रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कायदा व सुव्यवस्था दृष्टीकोनातून बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा मार्ग २१ सप्टेंबर दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत बंद करून यावेळेत मुदतीत बहाद्दुरशेख नाका पॉवर हाऊस चिंचनाका तसेच चिंचनाका पॉवर हाऊस बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा पर्यायी मार्ग करण्याबाबत आदेश होणेस विनंती केली आहे. त्याअर्थी, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी सादर केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये हा आदेश दिला आहे.

वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. या वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button