रेशन दुकानदार संघटना २३ सप्टेंबर रोजी घेणार पालकमंत्री उदय सामंत यांची भेट

चिपळूण : थकित कमिशन तत्काळ देण्याचे पुरवठा विभागाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यात येणार असून सध्या सणासुदीच्या दिवसांत लाभार्थ्यांची गैरसोय नको म्हणून धान्य वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.
श्री. कदम म्हणाले की, जिल्हा पुरवठा विभागाने फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै व ऑगस्ट या पाच महिन्याचे प्रती क्विंटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन दुकानदारांना अद्याप दिलेले नाही. तसेच अनेक मागण्याही शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यामुळे दुकानदार अडचणीत आले असून पैशाअभावी गणपती उत्सव आनंदाने माजा करता आला नाही या सणावेळी कमिशन न दिल्यास धान्य वितरण बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिल्यानंतर पुरवठा विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी काही महिन्यांचे तरी कमिशन गणेशोत्सवापूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. तरीही सणावेळी लाभार्थ्यांची गैरसोय नको म्हणून आम्ही धान्य वितरण सुरू ठेवले आहे. मात्र २३ रोजी पालकमंत्री सामंत यांची भेट घेऊन आम्ही आमच्या व्यथा त्यांना सांगणार आहोत. ते त्यात मार्ग काढतील असा विश्वास आम्हाला आहे. मात्र शासनाने लक्ष दिले नाही तर नजीकच्या काळात सर्व दुकानदार आंदोलन करीत असा इशाराही जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिला आहे.



