स्वायत्त कोकणाची मागणी; कोकणाच्या विकासासाठी आजपासून उपोषण सुरू
संजय यादवराव यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी : राज्याचे ४० टक्के उत्पन्न कोकण देत असेल, तर विकासाच्या निधीमध्ये ४० टक्के निधी कोकणाला मिळाला पाहिजे. यापुढे आमचा निधी संपूर्ण खर्च झाला पाहिजे, तो पश्चिम महाराष्ट्राकडे वळवता कामा नये, अशी प्रमुख मागणी घेऊन आपण स्वायत्त कोकणची मागणी करणार असल्याची माहिती संजय यादवराव यांनी दिली. त्यासाठी आज (१९ सप्टेंबर) स्वराज्य भूमी कोकण हे ऐतिहासिक आंदोलन छेडले जाणार असून, पहिल्यांदा शेकडो शेतकरी, मच्छीमार, पर्यटन व्यवसायिक एकत्र येऊन आपल्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठवणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना श्री. यादवराव म्हणाले की, आज ९.३० वाजता हातखंबा अलंकार हॉटेल येथे सर्वांना एकत्र भेटायचे आहे. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने गाड्यांमधून पुढे येऊन पुढे एक सभा आपला स्वायत्त कोकणचा जाहीरनामा घोषित करणे, आंदोलनाची मागण्या घोषित करणे, व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्यक्ष आमरण उपोषणाला सुरुवात होईल. काहीजण आमरण उपोषण काही जण साखळी उपोषणात सहभागी होतील. राजकारण विरहित सर्वसामान्यांच्या सहभागाचे कोकणच्या मूलभूत विकासाच्या विषय घेऊन हे पहिले भव्य आंदोलन आहे.आजपर्यंत कोकणाकडे जे दुर्लक्ष झाले ते पुरे पण यापुढे कोकणाकडे दुर्लक्ष होता कामा नये हा या आंदोलनाचा मुख्य आग्रह राहणार आहे. शेती उध्वस्त करणारे शेती बंद पडणारे माकडांची समस्या, मच्छीमार व अंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, २०२३ पर्यंत ची सर्व पर्यटन बांधकामे नियमित करावी व कोकणात उद्योग करणाऱ्या तरुणांना उद्योगाच्या सहज परवानगी द्या सबसिडी योजना राबवा, कोकणातील ९० टक्के नोकऱ्या कोकणातील तरुणांना मिळाल्या पाहिजेत, कापूस आणि उसाप्रमाणे काजू बी आणि सुपारीला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा मूलभूत मागण्या घेऊन आपण हे आंदोलन करत हे. त्यामुळे, असे या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने श्री. यादवराव यांनी केले.



