मुख्य बातमी

‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अंतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेचे आयोजन

ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन

रत्नागिरी : ‘स्वच्छता ही सेवा २०२४’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी “स्वच्छ सुंदर शाळा” या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या शाळांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपये आणि व प्रत्येकी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम केंद्र शासनाने निश्चित केली आहे.

स्वच्छ सुंदर शाळा निवडीसाठी शौचालय व्यवस्थापन (मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळे असणे आवश्यक, अपंग मुलांसाठी व्यवस्था), हात धुण्यासाठी व्यवस्था आवश्यक, घनकचरा व्यवस्थापन (ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापन असणे आवश्यक), सांडपाणी व्यवस्थापन, पाऊस पाणी संकलन, परिसर स्वच्छता, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यवाही, शालेय भिंतींवर स्वच्छताविषयक संदेश, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू विद्यार्थ्यांमार्फत तयार करणे, स्वच्छतेच्या अनुषंगाने शाळेने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषांवर गुणांकन केले जाणार आहे.

दिलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन करून प्रत्येक तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळेची निवड केली जाणार असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाईल आणि त्यातून एक ते तीन जिल्हास्तरीय क्रमांक काढण्यात येणार आहेत.

प्रारंभी तालुकास्तरीय तपासणी समितीमार्फत पाहणी केली जाणार असून, त्यानंतर जिल्हास्तरीय तपासणी समिती पाहणी केली जाईल. जिल्हास्तरावरील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या शाळांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपये आणि व प्रत्येकी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी “स्वच्छ सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये भाग घेवून स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button