उमरोली-आग्रेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
आमदार भास्कर जाधव यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन घेतला निर्णय

गुहागर : गुहागर मतदारसंघातील उमरोली – आग्रेवाडी (ता. चिपळूण) या वर्षानुवर्षे भाजपसोबत असलेल्या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी आज शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
सातत्याने सत्तेत असूनही भाजपने विकासकामे केली नाहीत हे लक्षात आल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या भागातील झालेल्या विकासाला प्रभावित होऊन आग्रेवडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी वाडीतील काही मुंबईवासी ग्रामस्थांनी आमदार श्री. जाधव यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाडीतील रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याची मागणी त्यांनी केली होती. ही मागणी तात्काळ मान्य करून आमदार श्री. जाधव यांनी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांना दिला होता. एकदा शब्द दिला की त्याची पूर्तता करणारच, अशी आमदार श्री. जाधव यांची ख्याती असल्याने रस्त्याच्या कामाचा शब्द मिळताच मुंबईवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
ग्रामस्थांची मुख्य मागणी असलेल्या रस्त्याला निधी मंजूर करूनच आमदार श्री. जाधव हे या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांनी अतिशय आनंदाने त्यांचे स्वागत करताना यापुढे कायम पाठीशी राहू, असा विश्वास दिला.
या कार्यक्रमाला पक्षाचे तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण, विभागप्रमुख संदीप घाग, काका चव्हाण, सुभाष मोहिते, दादा खेडेकर, सुदेश गमरे, प्रीतम वंजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



