वर्तक कुटुंबाचा कल्पवृक्षातून साकारलेला बाप्पा
पर्यावरणस्नेही संकल्पनेचे सलग १६ वे वर्ष : गणपती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

रत्नागिरी : उत्कर्षनगर कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनाही यावर्षीही पर्यावरणस्नेही गणपती बाप्पाची स्थापना केली असून, यंदाचे बाप्पा कल्पवृक्षाचे महत्त्व सांगण्यासाठी कल्पवृक्षातून साकारण्यात आले आहेत.
शहरापासून जवळच असलेल्या कुवारबाव येथील संजय जगन्नाथ वर्तक हे पर्यावरण स्नेही गणपती बाप्पा बनविण्यासाठी ओळखले जातात. वर्तक कुटुंबाचा गणपती “इकोफ्रेंडलीचा राजा” म्हणून रत्नागिरीत प्रसिद्ध आहे. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना राबवून ते बाप्पा साकारतात. यापूर्वीही त्यांनी काथ्या, नारळाची सोडणे, सुंभ आदींचा वापर करून बाप्पा साकारले आहेत. इकोफ्रेंडली गणपतीचे हे यंदाचे १६ वे वर्ष असून, यापूर्वी त्यांना अनेकदा घरगुती सजावट स्पर्धेत नाविन्यपूर्ण संकलनेसाठी गौरविण्यात आले आहे. वर्तक कुटुंबाचा गणपती हा घरगुती स्वरूपाचा असला, तरी त्यांच्या दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे त्यांचे गणपती बाप्पा पाहण्यासाठी दरवर्षी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करत असतात.
यंदाच्या गणपती बद्दल सांगताना संजय वर्तक म्हणाले, नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचे खूप सारे उपयोग आहेत, म्हणूनच तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. कल्पवृक्षाचा संदर्भ हा पुराणांमध्ये आढळतो. नारळाचे झाडे किनारपट्टीला लागलेली एक सुंदर देणगी आहे. म्हणूनच नारळाच्या झाडाच्या महत्त्वाबद्दल समाजाला जागरूक करण्यासाठी व नारळाची जास्तीत जास्त लागवड करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा देखावा संपूर्ण नारळाच्या झाडापासून साकारलेला आहे. “कल्पवृक्ष लावा कल्पवृक्ष वाचवा” असा संदेश या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.



