काजू बी शासन अनुदान योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनासाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२, कृषी खात्याचा दाखला, जीएसटी बील, बँक तपशील,आधार कार्ड, हमीपत्र आदी कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. अथवा पवन बेर्डे, कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ (७२१८३५००५४) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, एमआयडीसी कुडाळ, हापुस आंबा निर्यात सुविधा केंद्र जामसंडे (ता. देवगड) या ठिकाणी करण्यात आली आहे.



