मुख्य बातमी

नगरपालिकेच्या पर्यवेक्षकाचे निलंबन; २४ तासांत बसवणार सीसीटीव्ही

सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणार; शिवसृष्टीतील मावळ्यांच्या तोडफोडप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

रत्नागिरी : मारुती मंदिर येथे उभारलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड केल्याप्रकरणी रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाकडून अक्षम्य दिरंगाई झाली असल्याचा ठपका ठेवत पालिकेच्या पर्यवेक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच येथे २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यात येईल, महाराजांच्या पुतळ्यासमोर २४ तासांत सीसीटीव्ह बसवण्यात येईल, असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.

शहरातील मारुती मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीच्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्याची तोडफोड झालेली आज सकाळी शिवप्रेमींच्या लक्षात आली. याची माहिती तत्काळ नगर पालिकेला देण्यात आली. या घटनेनंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न शिवप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित केले होते. त्यामध्ये मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात घडलेल्या घटनेनंतर रत्नागिरीतील मारुनी मंदिर येथील महाराजांच्या पुतळ्याभोवती पोलीस

बंदोबस्त का ठेवण्यात आला नव्हता ? सीसीटीव्ही का सुरू केले नव्हते ? तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पर्यवेक्षक किती काळाने तिथे गेला आणि नगरपालिकेकडून या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेतली गेली या सगळ्याच गोष्टींचा जाब शिवप्रेमींनी पालिकेत परिषदेत जाऊन मुख्याधिकारी तुषार बाबर यांना विचारला.

यावेळी शिवप्रेमींनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि पर्यवेक्षकांकडून मिळालेली माहिती याचा ताळमेळ बसत नसल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या भावना मुख्याधिकाऱ्यांसमोर व्यक्त करताना नगरपालिका प्रशासनाकडून अक्षम्य दिरंगाई झाली असल्याची भूमिका मांडली. शिवप्रेमींच्या भावनांची आणि मागणीची तत्काळ दखल घेऊन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी या संदर्भात पर्यवेक्षक नितीन यादव यांचे तात्पुरते निलंबन केले असून त्यांच्यावर चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल ४८ तासांत देण्यात येईल असे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथे २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यात येईल आणि महाराजांच्या पुतळ्यासमोर २४ तासांत सीसीटीव्ही बसवण्यात येईल, असेही श्री. बाबर यांनी शिवप्रेमींना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button