जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत ‘नवनिर्माण हाय’च्या तीन विद्यार्थ्यांना पदके
हर्षदा मोहितेची विभागीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : डेरवण (ता. चिपळूण) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन मुलांनी चमकदार कामगिरी केली. वेदांत संतोष देसाई याने रौप्य, तर सई संदेश सुवारे हिने कांस्य पदकाची कमाई केली. हर्षदा अशोक मोहिते हिने सुवर्णपदकाला गवसणी घालत विभागीय स्पर्धेत धडक मारली आहे.
छ्त्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. यात १७ वर्षांखालील गटात हर्षदा मोहिते, सई सुवारे आणि वेदांत देसाई या तिघांनीही सुवर्णपदक पटकावले होते. त्यांची निवड जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली होती.
दि. २९ व ३० ऑगस्टला जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी येथे झाल्या. या स्पर्धेतही या तिघांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. हर्षदा मोहितेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही मुले रत्नागिरीतील युवा तायक्वांदो क्लबमध्ये प्रशिक्षक राम कररा आणि प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना ‘नवनिर्माण हाय’चे क्रीडा शिक्षक अमृत गोरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.
या मुलांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, ‘नवनिर्माण हाय’चे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



