लवकरच चित्र स्पष्ट होईल: धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : व्हॉट्सॲप कंपनीला फोन लावून त्यांच्याकडे तीन चार नंबर्सची डिटेल मागविण्यात आली असून, ७ सीसीटीव्हींचे फुटेज हातात आहेत. चाचणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांच्या वैद्यकीय अहवालही लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याने लवकरच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
काल (२९ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तरुणीने दिलेली माहिती आणि तपास करताना समोर येणारी माहिती यात तफावत असून, अनेक डॉट्स समोर आले आहेत. आता हे डॉट्स जोडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, रत्नागिरी हे महिलांसाठी सुरक्षित असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. रत्नागिरी शहरात ३ शहर पोलीस ठाण्याच्या, तर २ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गाड्या तसेच १५ कर्मचारी रोजचे गस्त घालत आहेत. कोणत्याही महिलेला, मुलीला थोडे जरी असुरक्षित वाटले तरी त्यांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. पुढच्या १० मिनिटांत त्या महिलेला पोलिसांची मदत मिळेल.
रत्नागिरी पोलीस सदैव नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असून, रत्नागिरीकरांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा, असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.



